पुसेसावळी : मंगळवार 26/12/2023 रोजी औंध पोलीस स्टेशन हद्दीतील *पळशी* तालुका खटाव जिल्हा सातारा गावातील बालक नामे कु.सोहम गणेश निंबाळकर वय 5 वर्षे शाळेत बसायचे नाही म्हणून रडायला लागला म्हणून सकाळी 10:45 वाजता शिक्षकांचा फोन येतात,त्याच्या वडिलांनी त्याला शाळेतून आणून घरी सोडले व शाळेत का जात नाहीस. शाळा तुला का नको वाटते! त्याला शाळेची आवड लागावी आणि तो दररोज शाळेत जावा या संदर्भाने थोडेसे ओरडून समजून सांगितले आणि आपल्या कामानिमित्त ते घराबाहेर पडले.
थोड्यावेळाने घरी येऊन बघिताय तर काय! मुलगा घरात दिसेनासा झाला,हे कळताच कुटुंबीयांनी शेजारी/पाहुणे यांच्याकडे खूप शोधाशोध करूनही मुलगा सापडत नाही,हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील सागर जाधव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन(18002703600) नंबर वरून ही माहिती तात्काळ आसपासच्या संपूर्ण गावाला व औंध पोलीस स्टेशनला कळवली आणि तात्काळ औंध पोलीस स्टेशनचे अधिकारी-अंमलदार व पळशी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि त्या 5 वर्षांच्या चिमुकल्याची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू झाली. कुटुंबीयाच्या काळजाचे जणू पाणी पाणी झाले,जणू काळजाचे ठोकेच चुकले होते.
मनात वेगवेगळे विचार घर करून जात होते.आसपासच्या परिसरामध्ये तरस-लांडग्याचा वावर असल्याने भीती जास्त बळावत चालली होती.सर्व गावकरी घराजवळ एकवटले आणि त्या चिमुकल्याचा शोध सुरू झाला आणि अखेर घरा शेजारील मक्याच्या शेतात कु.सोहम गणेश निंबाळकर दडून बसलेला आढळून आला. मुलाला सुखरूप पाहून औंध पोलीस व मुलाचे आई-वडील,पळशी ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.