कराड : घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याचा प्रकार कराडमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीवर प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सकाळी छापा टाकला. यामध्ये पाच रिक्षांसह गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी गाडी आढळली.
याप्रकरणी गॅस एजन्सीच्या चालकासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गॅस एजन्सीचालक किरण दिनकर सूर्यवंशी (रा. गोवारे, ता. कराड), बाबासाहेब इसाक मुल्ला (शनिवार पेठ, कराड),सादिक मुबारक मुजावर (सोमवार पेठ, कराड), इर्शाद रियाज नदाफ (वारुंजी फाटा, ता. कराड), अजित नारायण महाडिक (गजानन हाउसिंग सोसायटी) आणि सागर जगन्नाथ शिंदे (शुक्रवार पेठ, कराड) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, घरगुती गॅस बेकायदेशीररित्या रिक्षांमध्ये भरण्याचे काम शहरातील मध्यवस्तीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते.
याबाबत पुरवठा विभागाकडे वेळोवेळी तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी डी. एन. चंद्रा, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पुरवठा विभागाचे अधिकारी महादेव अष्टेकर यांनी या अड्ड्यावर मंगळवार, दि. 10 रोजी सकाळी छापा टाकला. त्यावेळी या खोलीत 18 गॅस सिलिंडर, बाहेरच्या बाजूस सिलिंडरमधून रिक्षात गॅस भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मशीन, पाच रिक्षा व गॅस सिलिंडर वाहतुकीची गाडी आढळली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.