डोळ्यात मिर्चीची पुड टाकुन व्यापार्‍यास लुटण्याचा प्रयत्न

0

जामखेड शहरातील घटना ;एकास अटक तीघांवर गुन्हा दाखल 

जामखेड तालुका प्रतिनिधी :

जामखेड शहरातील शितल कलेक्शनचे कापड व्यापारी सागर अंदुरे यांना तीघांनी डोळ्यात मिर्चीची पुड टाकुन लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून डोळ्यात मिर्चीची पावडर गेली असताना देखील अंदुरे यांनी एकास पकडले. याप्रकरणी एकुण तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की  शनिवार दि. २२ रोजी शितल कलेक्शनचे संचालक कापड व्यापारी सागर अंदुरे हे नेहमीप्रमाणे आपले कापड दुकान रात्री साडेनऊच्या आसपास बंद करून व सोबत दोन लाख रुपये असलेली पैशांची बॅग घेऊन स्कुटी वरून आपल्या जामखेड शहरातील राजमाता जिजाऊ नगर येथे घराकडे निघाले होते. त्यांनी आपली स्कुटी गाडी गेटच्या बाहेर लावुन घराचे गेट उघडत असताना पाळत ठेऊन असलेल्या आरोपींनी त्यांच्या गळ्यातील बँग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता यातील आरोपी करण सुदाम चव्हाण, वय २० वर्षे रा. आरोळे वस्ती, जामखेड या आरोपीने त्याच्या सोबत आणलेली मिर्चीची पूडी त्यांच्या डोळ्यात फेकली.

यातील एका आरोपीने पुन्हा त्यांच्या गळ्यात अडकवलेली दोन लाख रुपयांची पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला या झटापटीत फिर्यादी सागर अंदुरे यांनी प्रसंगावदान राखून यातील करण सुदाम चव्हाण या आरोपीला पकडून ठेवले यावेळी दुसरे दोन जण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होते मात्र सागर अंदुरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला राहत असलेले लोक धावत आले मात्र त्यापूर्वीच यातील दोन अनोळखी आरोपी पळून गेले. 

यानंतर पकडून ठेवलेल्या आरोपीला घटनास्थळी पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला पकडलेल्या आरोपीसह एकूण तीन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत. 

जामखेड शहरात काही वर्षांपुर्वी तपनेश्वर रोडवर असेच एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता तसेच नान्नज येथील एका कांदा व्यापाऱ्याला काही महीन्यांपुर्वी पाडळी फाटा येथे लुटले होते. जामखेड व परिसरात अशा लुटालुटीच्या घटना सतत चालू आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलीसांनी चांगला कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here