छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात बीड बायपास, रेल्वेस्टेशन परिसरात दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या; तसेच पोलिसावर हल्ला करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना वेदांतनगर आणि सातारा पोलिसांनी अटक केली.
अविनाश भगवान देवडे (रा. उस्मानपुरा) आणि अक्षय ऊर्फ भैया रमेश वाहूळ (रा. सातारा परिसर) अशी संशयितांची नावे आहेत.
ता. २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान रेल्वेस्टेशन रोड, बन्सीलालनगर, बीड बायपास भागात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत सात दुकाने फोडली होती. हे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. यामागे कुख्यात अविनाश देवडे आणि अक्षय वाहूळ यांचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. शुक्रवारी रात्री ‘नंदीग्राम’ने आरोपी येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती.
तीन ठिकाणी लावला ट्रॅप
सातारा आणि वेदांतनगर पोलिसांनी तीन पथके तयार करून पार्किंग, प्लॅटफॉर्मजवळ तीन ठिकाणी ट्रॅप लावला होता. रेल्वे आल्यानंतर प्रवासी खाली उतरताना संशयित आरोपी अविनाश देवडे हा गर्दीत मिसळून निघून जात असताना जमादार बाळाराम चौरे यांच्या नजरेस पडला. ‘चोरऽऽ चोरऽऽ’ असे ओरडत त्यांनी नागरिकांच्या मदतीने देवडेला ताब्यात घेतले.
दुसरा संशयित अक्षय हा दहा मिनिटांनंतर बाहेर आला. त्यालादेखील पथकाने अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव, संग्राम ताठे, पीएसआय वैभव मोरे, प्रवीण मुळे, रणजितसिंग सुलाने, विलास डोईफोडे, एपीआय देशमुख, पीएसआय भंडारे, रितेश जाधव व दीपक शिंदे यांनी केली
अक्षयने केला होता पोलिसावर हल्ला
अक्षय वाहूळ याने ता. २७ नोव्हेंबरला सातारा परिसरात एका वाइन शॉपमालकाच्या गळ्यावर तलवार ठेवत दारूची मागणी केली होती. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पाच दिवसांनी पुन्हा अक्षयने याच दारू दुकानाच्या कामगाराला चाकूचा धाक दाखवत दारूची मागणी केली होती. मालकाने पोलिसांना बोलावल्यानंतर अक्षयने पोलिसावर चाकूहल्ला करीत पलायन केले होते. याप्रकरणी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
दोन्ही आरोपींवर एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, घरफोडी, विनयभंग आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वी अक्षय वाहूळ एमपीडीएमध्ये जेलमध्ये होता, नुकताच तो बाहेर आला आहे; तसेच अविनाश देवडे हा हद्दपार गुन्हेगार आहे.