नाशिक येथील :कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. लाचखोर अधिकारी सापडण्याची गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
नाशिक येथे सरकारी कार्यालयांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून नाशिक आता लाचखोरीत अग्रेसर असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लाचखोरीत महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे हॉटेल असून हॉटेलमध्ये बाल कामगार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांनी हॉटेल चालकास बालकामगार नसल्याचा निरंक अहवाल देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागितली होती.तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कामगार निरीक्षक निशा बाळासाहेब आढाव (५३, रा. गंगापूर रोड) यांना गुरुवारी (ता. १५) कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी उपाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस नाईक मनोज पाटील, शितल सूर्यवंशी, अजय गरुड यांच्या पथकाने सापळा रचला त्यात निशा आढाव या कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने कामगार उपायुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे.