सातारा : अनिरुद्ध हेल्थ ॲण्ड ॲग्रो कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एकाची तब्बल २६ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सांगलीतील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पूजा कदम- पाटील, प्रकाश भीमराव पाटील- माने (रा. त्रिमूर्ती अंगण, गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामगृह बाग, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोडोलीतील नवीन एमआयडीसीतील हॅप्पी हौसिंग सोसायटीमध्ये दि. २८ डिसेंबर २०२२ ते २२ जून २०२३ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे.
पूजा कदम-पाटील, प्रकाश पाटील- माने यांनी फिर्यादी शंकर दिनकर खामकर (वय ५६, रा. कोडोली, ता. सातारा) यांना अनिरुद्ध हेल्थ ॲण्ड ॲग्रो कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी खामकर यांच्याकडून वेळोवेळी २८ लाख ६५ हजार ५१० रुपये घेतले. मात्र, त्या बदल्यात १ लाख ६७ हजार ९०० रुपये दिले. उर्वरित २६ लाख ९८ हजार ६१० रुपयांची फसवणूक केली आहे.