भाडेकरूबरोबरच्या प्रेमसंबंधांतून पत्नीनंच दिली सुपारी
पुणे : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या त्यांच्याच पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 48 वर्षीय मोहिनी वाघ यांना 25 डिसेंबर रोजी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे मोहिनी वाघ यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्याशी असलेले विवाहबाह्य संबंध हे या हत्येमागंचं प्रमुख कारण आहे. तसेच सतीश वाघ यांच्याकडून रोजच्या होणारी मारहाण आणि आर्थिक व्यवहार स्वतःच्या हातात यावेत म्हणून पत्नीनंच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
विधान परिषदेचे आमदार आणि भाजप नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील 4 आरोपी पवन श्यामसुंदर शर्मा (30 वर्ष ), नवनाथ अर्जुन गुरसाळे (31 वर्ष ), विकास उर्फ विकी सिताराम शिंदे (28 वर्ष), अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर (29 वर्ष), अतिश संतोष जाधव (20 वर्ष) यांना यापुर्वीच अटक केली होती.
या पाचही आरोपींच्या चौकशीनंतर हत्येच्या पहिल्या दहाच दिवसांत पुरावे गोळा करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी माध्यमांना दिली. बलकवडे यांनी म्हटलंय,”हत्या झाल्यानंतर पहिल्या दहाच दिवसांत पुरावे गोळा करण्यात आले होते. त्या पुराव्यांच्या अनुषंगानं मोहिनी वाघ यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. सतीश वाघ यांच्या हत्येचा कट मोहिनी वाघ यांनीच रचला होता.”
या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता नुसार, कलम 103(1) ,140(1), 140 (2) ,140 (3) ,142 ,61 (2) ,238 (ब) 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपी अटक करण्यात आली असली तरी अजून कोणाचा यात सहभाग आहे का या अनुषंगाने तपास चालू असल्याची माहिती शैलेश बलकवडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान मोहिनी वाघ यांनी स्वतःच्याच नवऱ्याची सुपारी देऊन हत्या का केली? याचा उलगडा देखील शैलेश बलकवडे यांनी केला आहे. नवऱ्याकडून होणारा त्रास हे या खुनामागचं प्रमुख कारण असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यांनी म्हटलंय,” मोहिनी वाघ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सतीश वाघ त्यांना रोज मारहाण करायचे. तसेच आर्थिक व्यवहारसुद्धा स्वतःच्या हातात यावेत हा ही या हत्येमागचा एक हेतू असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.” या प्रकरणासंदर्भात कसून चौकशी केल्यानंतर मोहिनी वाघ यांनी या प्रकरणातला प्रमुख आरोपी अक्षय जावळकर याच्यासोबत संबंध असल्याची कबुली पोलिसांना दिली. हे सुद्धा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येमागेचं मुख्य कारण असल्याचं शैलेश बलकवडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय जावळकर हा वाघ यांच्याकडं 15 वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होता. साल 2001 ते 2016 दरम्यान अक्षय जावळकरच्या कुटुंबांचं फुरसुंगी या ठिकाणी वास्तव्य होतं. मात्र 2016 ला त्यांनी ते घर सोडलं आणि त्यानंतर त्याच परिसरात जवळपास 400-500 मीटर अंतरावर असलेल्या एका घरात त्यांनी भाड्यानं राहायला सुरुवात केली.
“अक्षय जावळकर यानं जवळपास पाच लाख रुपये चार मारेकऱ्यांना देण्याचं कबुल केलं होतं. त्यातली काही रोकड पोलिसांनी जप्त देखील केली आहे. ही सगळी रोकड अक्षय जावळकर यानंच मारेकऱ्यांना दिली आहे.” असं बलकावडे यांनी सांगितलं.
दरम्यान मोहिनी वाघ यांचा या आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे अजून हाती आले नसल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. तसंच सतीश वाघ यांना पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यातील संबंधांची कल्पना होती का याबद्दल अजून तपास चालू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
9 डिसेंबरला पहाटेच्या वेळी पुण्यातील फुरसुंगी फाटा परिसरात राहणारे सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. या दरम्यान पुणे-सोलापूर मार्गावरील फुरसुंगी फाटा परिसरातील ब्ल्यू बेरी हॉटेल समोर चारचाकी गाडीतून आलेल्या आरोपींनी सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळं हा सर्व प्रकार समोर आला होता. अपहरण केल्यानंतरच्या प्रवासात गाडीतच वाघ यांच्या अंगावर अनेक गंभीर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान या संदर्भात सतीश वाघ यांच्या मुलानं हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांचा तपास देखील सुरू केला होता. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी सतिश वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचनजवळच्या शिंदवणे घाटात आढळून आला होता.