फुकट बिर्याणी पडली महागात; बारामतीतील तिघांना 6 वर्षांची शिक्षा अन् प्रत्येकी 1 लाखांचा दंड

0

बारामती : तुला लय मस्ती आली काय ? आम्हाला फुकट बिर्याणी देत नाही काय ? असे म्हणून हॉटेल व्यवसायिकाच्या मानेला लोखंडी कोयता लावून मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना न्यायालयाने 6 वर्षाची शिक्षा व प्रत्येकी 1 लाखांचा दंड ठोठावून चांगलीच अद्दल घडविली आहे.
किशोर उर्फ डाबर संजय ढोरे (वय -32), अभिजित उर्फ छोटा डाबर अनिल ढावरे (वय 25) राहुल बाबुराव ढावरे (वय 29 सर्व रा एसटी स्टॅण्ड समोर आमराई, बारामती जि पुणे) अशी शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सद्दाम हारून कुरेशी (वय 25, जामा मजीद समोर बारामती ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी हे एक व्यावसायिक असून त्यांची खाटीक गल्लीच्या परिसरात एक मटणाची खानावळ आहे. कुरेशी हे 19 डिसेंबर 2018 ला रात्रू सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुकानावर पायी चालले होते. तेंव्हा अचानक पाठीमागून दोन मोटार सायकल आल्या. त्यावर
पाच इसम आले होते. त्यातील किशोर ढोरे, अभिजित ढावरे व राहुल ढावरे हे फिर्यादी कुरेशी यांच्याजवळ आले. तुला लय मस्ती आली काय ? आम्हाला फुकट बिर्याणी देत नाही काय ? असे म्हणून कुरेशी यांच्या मानेला आरोपींनी कोयता लावून मारहाण केली.

त्यानंतर आरोपी, फिर्यादी यांना खानावळीत घेऊन गेले. आणि गल्ल्यातील रक्कम घेऊन पळून गेले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. तिन्ही आरोपींवर मोक्का कायदा कलम 3(1)(ii),3(4) प्रमाणे कारवाई करण्यात आली होती. तिन्ही आरोपी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी कामकाज पहिले. ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालायने वरील तिन्ही आरोपींना भारतीय दंड विधायक कलम 392 ,34 व मोक्का अन्वये सन 2018 साली अटक तारखेपासून आजपर्यंत शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशा स्वरूपाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र (स्पेशल मोक्का कोर्ट) न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश व्यंकटराव वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांची या खटल्यास सरकारी वकील ॲड. चंद्रकिरण साळवी यांना बहुमुल्य मदत मिळाली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here