बदलापूर अत्याचार प्रकरणाचा चौकशी समितीकडून सरकारला अहवाल सादर

0

ठाणे : 

राज्य  सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातही याबाबतीत अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. यात शाळा, स्थानिक पोलीस प्रशासन, आरोग्य व्यवस्था अशा सर्वच यंत्रणांच्या ढिसाळ कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. या चौकशी अहवालामध्ये समितीने शाळेचे संस्था चालक  मुखाध्यापिका ,वर्ग शिक्षिका शालेय दोन सेविका यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे त्याच प्रमाणे पोलिसांच्या कार्य पद्धतीवरही ताशेरे ओढले आहे. 

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात एकापाठोपाठ धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. त्यात भर म्हणजे आता शाळेतील सीसीटीव्हीचं 15 दिवसांचं फुटेज गायब असल्याची बाब सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातून समोर आली आहे.बदलापूरच्या या शाळेत 13 ऑगस्ट रोजी नर्सरीतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. त्यानंतर बदलापूरसह राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.या प्रकरणी शाळा व्यवस्थापन, स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडून अनेक ठिकाणी दिरंगाई झाल्याचं आत्तापर्यंत समोर आलं.आता 

या अहवालातील माहितीनुसार शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. तसंच महिला सेविकांनी त्यांचं काम नीट केलं नाही, म्हणून त्यांनाही सहआरोपी बनवा अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.पीडित मुलींच्या वैद्यकीय चाचणीला उशीर झाल्याने पुराव्यांच्या दृष्टीने यावर परिणाम झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. त्याचबरोबर पीडित मुलींना वैद्यकीय चाचणीसाठी पहाटे साडे तीन वाजेपर्यंत थांबवून ठेवल्याचंही अहवालात म्हटलं आहे. त्यानंतरही पूर्ण चाचण्या झाल्या नाही, असा दावा करण्यात आला आहे.

1. या प्रकरणातील प्रत्यक्ष तपास अधिकारी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांनी चौकशी पथकासमोर, “मी सध्या वैद्यकीय रजेवर असून कोणताही जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही,” असं सांगून तपास पथकास असहकार्य दर्शवले.

पालक, पीडित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी कधी आले? त्यांनी शाळेत भेट दिली का? एफआयआर किती वाजता नोंदवण्यात आली? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले, पण त्यांनी सध्या मला काही सांगता येणार नाही असं म्हणत, अनिश्चित कालावधीची मुदत मागितली.

2. संबंधित शाळेतील घटना 13 ऑगस्ट 2024 रोजी शाळेच्या परिसरातील प्रसाधनगृहात घडली आहे. ही जागा शिशूवर्गाच्या खोल्यांपासून लांब एका बाजूला आहे. शिशूवर्गात शिकणारे विद्यार्थी शाळा प्रमुखांच्या देखरेखीत असणं आवश्यक आहे.

3. विद्यार्थिनींच्या शौचालयाची साफसफाई करण्यासाठी महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु सदर शाळेत हे काम पुरुष कर्मचाऱ्याला देण्यात आले होते. ही बाब अनुचित असून सदर घटना घडण्यास ती कारणीभूत आहे.

4. शाळेने कर्मचारी नियुक्त करताना साफसफाई करणाऱ्या कर्मचारी वर्गाची चारित्र्य पडताळणी केलेली दिसून येत नाही.

5. लहान मुलांना प्रसाधनगृहात नेण्याकरिता महिला सेविका असणे आवश्यक असूनही सदर पीडित मुलींना प्रसाधनगृहामध्ये नेण्याचे काम महिला सेविका कर्मचाऱ्यांनी केले नाही. तसंच वर्गशिक्षिकेनेही मुलींना एकटेच निष्काळजीपणे सोडले.

6. सदर घटना घडत असताना पीडित मुलगी बऱ्याच कालावधीकरिता वर्गात उपस्थित नसतानाही सदर बाबीकडे लक्ष देण्यात आले नाही.

7. प्रसाधनगृहात मुलींसोबत घडलेल्या घटनेनंतर मुली जेव्हा वर्गखोलीत आल्या, तेव्हा त्यांच्या वर्तनात झालेल्या बदलाची नोंद वर्गशिक्षिकेने घेतली नाही.

8. वैद्यकीय तज्ज्ञांकडून सदर मुलींच्या खाजगी जागेवर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर मुलींकडे वर्गशिक्षिकेचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून स्पष्ट होते.

9. पालकांनी शाळेला 14 ऑगस्ट रोजी माहिती दिली असताना पोलिसांना शाळेने तत्काळ कळवणे आवश्यक होते परंतु याबाबत शाळा किंवा व्यवस्थापनाने निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते.

10. विद्यार्थ्यांबाबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास शाळा प्रमुखांना तत्काळ दखल घेत कारवाई करणं आवश्यक असतं. या घटनेत प्रशासनाकडून तसंच शाळेकडून गंभीर कृत्य लपवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. घटना घडल्यावर शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केल्याचे दिसते.

11. शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा आहे आणि शाळा असुरक्षित आहे. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे दिसले. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधने शाळेत नव्हती.

12. प्रसाधनगृहाकडील सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीत आढळून आलेले नाहीत. शाळेतील सर्व सीसीटीव्हीमध्ये मागील 15 दिवसांचे ते रेकॉर्डिंग उपलब्ध नव्हते.

13. प्रसाधनगृहांची पाहणी केली असताना महिला प्रसाधनगृहांना दरवाजे नव्हते. तसेच प्रसाधनगृह सुस्थितीत आढळून आले नाहीत.

14. शाळा व्यवस्थापनाने घटना लपवण्याचा आणि घटनेची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अशा गंभीर घटनेत शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन मंडळ उदासीन असल्याचे आढळून आले आहे. तसंच पालकांना परस्पर शांत करण्याचा प्रयत्न करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

15. सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेले असून सदर कंत्राटाचा करार, अटी आणि शर्ती काय निश्चित करण्यात आल्या होत्या याबाबत माहिती देण्यात व्यवस्थापनाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे सदर कंत्राट नियमानुसार देण्यात आले नव्हते अशी शंका निर्माण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here