बायकोच निघाली नवऱ्याची वैरी…

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी ;
            बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून नवऱ्याचा संयम सुटला आणि त्याने इतर कोणताही विचार न करता दि. २८ डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे घडली होती. मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी आत्महत्या करण्याचे कारण व सर्व घटना चिठ्ठीत लिहून तसेच मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवल्याने सदर घटनेला वाचा फुटली . आत्महत्येचे कारण समजताच पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरविले व आरोपींचा छडा लावला. त्यातील एक आरोपी गजाआड केला आणि दहा दिवसांनी इतर आरोपी पकडले गेले. मात्र प्रियकरामुळे बायकोच आपल्या नवऱ्याची वैरी निघाल्याने ताहाराबादसह पंचक्रोशीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

   

रमेश ऊर्फ रामा भाऊसाहेब गांगड (वय ३०) हा त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील ताहाराबाद (कुरणवस्ती) येथे राहत होता. त्याने शनिवार, दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.  मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीत लिहून ठेवली तसेच त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड करुन ठेवले. त्यानूसार रमेश याची पत्नी ताराबाई हिचे शेजारीच राहणारा रवी नामक तरुणाशी अनैतिक संबंध होते. रमेश ऊर्फ रामा याने अनेक वेळा त्याची पत्नी तारा व रवी यांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर आरोपींनी अनेक वेळा रमेश ऊर्फ रामा याला दमदाटी करुन मारहाण केली होती.

   

आरोपींच्या त्रासाला कंटाळून रमेश ऊर्फ रामा याने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आरोपींना अटक झाली पाहिजे. असा मजकूर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला आहे. रमेश ऊर्फ रामा याच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी ताराबाई रमेश ऊर्फ रामा गांगड, रवी एकनाथ गांगड, सचिन एकनाथ गांगड, (रा. ताहाराबाद, ता. राहुरी) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी एक आरोपी वगळता संबंधित पत्नी व तिचा प्रियकर आत्महत्या केल्यापासून फरार होते.
         यावेळी राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रविंद्र कांबळे, अविनाश दुधाडे आदि पोलिस पथकाने ताहाराबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला. यावेळी एक आरोपी सचिन एकनाथ गांगड याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपी रवी गांगड व मयताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते. त्यांनतर त्यांच्या शोधार्थ राहुरी पोलिस पथके अनेक ठिकाणी रवाना झाले होते. पतीच्या दशक्रिया विधीनंतर म्हणजे गेल्या दहा दिवसांनंतर अनैतिक संबंधातील पत्नीचा पोलिसांना शोध घेतला आणि तिला ताब्यात घेण्यात आले आहे. 

      याबाबत राहुरी पोलीस संबंधित प्रियकर व त्या महिलेची कसून चौकशी करत आहे. या घटनेमुळे संबधीत मयत तरुणाचा संसार उघड्यावर पडला आहे. तिला व इतर दोन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मयत तरुणाच्या कुटुंबियांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here