नागठाणे : बाेरगाव येथील एका वृद्धाच्या खूनप्रकरणी एकास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व ३० हजाररूपये दंडाची शिक्षा सुनावली. विशाल प्रल्हाद शितोळे (रा. आंबेवाडी, ता. सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची हकीकत अशी, दि. १३ ऑगष्ट २०१८ रोजी मृत विजय तातोबा साळुंखे हे सायंकाळी बोरगाव उड्डाण पुलाखाली बसले होते. त्यावेळी आरोपी विशाल हा तिथे आला व तेथे काचेच्या बाटल्या फोडू लागला. त्यावेळी विजय साळुंखे यांनी विशाल यास बाटल्या फोडून काचा कशाला करतोस? असे सुनावले. याचा राग मनात धरून विशाल याने त्याच्याकडील चाकूने विजय साळुंखे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात पाठीत चाकूचा वार खोलवर झाल्याने साळुंखे गंभीर जखमी झाले होते.
त्यांना उपचारासाठी सातारला नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे आरोपी विशाल याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यास अटक केले होते. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने बोरगावसह परिसरात खळबळ माजली होती. आज या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी विशाल साळुंखे यास १० वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी वकील वैशाली पाटील यांनी काम पाहिले. तत्कालीन स. पो. नि संतोष चौधरी यांनी या गुन्हयाचा तपास केला होता. त्यांना तत्कालीन उपनिरिक्षक नानासाहेब कदम, पो. कॉ. चेतन बगाडे यांनी सहकार्य केले होते. दोषसिद्धीसाठी पो. ना. सुनिता देखणे, ए. एस. आय विजय देसाई यांनी परिश्रम घेतले.