ब्राम्हणीत जमिनीच्या वादातून वडिलांचा खून?

0

कोरोना झाल्याचे भासवून खून केल्याचा आरोप;ब्राम्हणीतील दोघांसह पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

जमीन हडपण्यासाठी कोरोना काळात कोरोनाची लागण झाल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर टोल नाक्याजवळील  शिवम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीचा खून केला, असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलाने केला आहे. याप्रकरणी मुलाने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशावरुन हडपसर पोलिसांनी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील दोघांसह एकूण चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हा प्रकार 26 मे 2021 ते 26 जून 2024 या कालावधीत घडला आहे.

नारायण बापू तेलोरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश विलास पोटे (वय 37, रा. मांजरी ग्रीन अॅनेक्स, हडपसर), विलास नारायण तेलोरे  (वय 57), आकाश विकास तेलोरे  (वय 28, दोघे रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, अहमदनगर), शिवम हॉस्पिटल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र नारायण तेलोरे (वय 45, रा. खळेवाडी, मु.पो. ब्राह्मणी, ता. राहुरी जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फौजदारी संहिता कलम 156(3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गणेश पोटे हा पोलीस कर्मचारी आहे तर, विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते व पुतणे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात मध्ये फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता. फिर्यादी नाशिक येथे राहत असून त्यांचे आई-वडिल मुळ गावी राहत होते. ते दोघेही आजारी असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी केअरटेकर म्हणून एका महिलेला कामावर ठेवले होते. 

गणेश पोटे हा मांजरी येथे राहतो. तर विलास आणि आकाश हे फिर्य़ादी यांच्या आई-वडिलांना जमीनीसाठी त्रास देत होते. त्यामुळे मयत नारायण यांचे तिघांविरोधात सतत वाद होत होते. 14 मे 2021 रोजी गणेश पोटे याने केअरटेकरला न सांगता फिर्य़ादी यांच्या वडिलांना मांजरी येथे आणले. त्यानंतर 26 मे 2021 रोजी मध्यरात्री शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे फिर्यादी यांना सांगितले. तसेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले. वडिलांच्या मृत्यू बाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन घाईघाईने वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

वडिलाच्या मृत्यू बाबत संशय आल्याने फिर्य़ादी यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. डॉक्टरने पोटे यांना बोलावून घेतले. पोटे याने फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत गावात कोठेही बोलू नको, आमच्या नादी लागू नको. नाहीतर तुझ्या बापाच्या किडन्या जशा गायब केल्या, तशा तुझ्यापण गायब करुन तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली. तसेच काठी, तलावर व गजाने मारहाण केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here