अंबड : माफियांविरोधात राज्यात प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्ह्यात नऊ वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. या नऊ जणांना सहा महिन्यासाठी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे.
या वाळूमाफियामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
तडीपारीच्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोणाचा साला आहे, कोणाला नातेवाईक आहे, याच्यावर कारवाई होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते. या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणं घेणं नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर या नऊ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.