मोबाईल फोडल्याचा आरोप केल्याच्या कारणाने युवकाची आत्महत्या

0

दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

जेएनपीए दि 7(विठ्ठल ममताबादे ): मोबाईल जसा चांगला आहे तसे वाईट सुद्धा आहे. मोबाईल मुळे आजपर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र उरण तालुक्यात मोबाईल मुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.मोबाईल मुळे झालेल्या भांडणातून बेलपाडा येथील सर्वेश कोळी याने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे.

उरण तालुक्यातील जासई बेलपाडा गावात राहणाऱ्या राजश्री कोळी व योगेश कोळी या दाम्पत्याने गावातील सर्वेश कोळी याच्यावर 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन फोडल्याचा आळ घेतल्याने सर्वेशने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे उरण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर न्हावा शेवा पोलिसांनी सर्वेशच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या राजश्री कोळी व योगेश कोळी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून योगेश कोळी याला अटक केली आहे.मात्र राजश्री कोळी यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. एकाच वेळी पती पत्नी असलेल्या योगेश कोळी व राजश्री कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाले असताना फक्त योगेश कोळी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र राजश्री कोळी यांना अटक झालेली नाही. त्यामुळे सर्वेश कोळी याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या राजश्री कोळी हिला सुद्धा अटक व्हावी. या दोघांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वेशच्या कुटुंबियांनी केली आहे.

सर्वेश कोळी वय वर्षे 20 हा तरुण युवक उरण तालुक्यातील जासई बेलपाडा येथे वडिल प्रभाकर कोळी व आजी सावित्री कोळी यांच्यासोबत राहत होता. हा होतकरू तरुण मासेमारी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी सर्वेशने गावातील संयोग कोळी याला दारू पाजून तसेच त्याला मारहाण करून त्याचा 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोडल्याचा आरोप संयोगचे आई वडिल योगेश कोळी व राजश्री कोळी यांनी सर्वेशवर केला.

कोळी दाम्पत्याने सर्वेशच्या घरी जाऊन त्याच्या आजीसोबत भांडण करून 40 हजार रुपये परतफेड करा अन्यथा सर्वेशला ठार मारून टाकू अशी धमकी दिली. यामुळे सर्वेशला प्रचंड मानसीक त्रास झाला.सर्वेशची आर्थिक परिस्थिती अगोदरच खराब होती. त्यातच या घटनेमुळे सर्वेश प्रचंड मानसिक ताणतणावाखाली होता. त्यातूनच त्याने आपल्या घरातील वरच्या मजल्यावर जाऊन मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या दोरीने लोखंडी पाईपला गळफास घेउन आत्महत्या केली. सर्वेशच्या अकाली जाण्याने सर्वेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सर्वेश कोळीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कायदेशीर व्हावी अशी मागणी सर्वेश कोळीच्या कुटुंबियांनी केली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत. मोबाईल मुळे सर्वेश कोळी याला जीव गमवावा लागला असल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here