सातारा प्रतिनिधी; निसर्गरम्य:परिसर म्हणविणाऱ्या साताऱ्यात उष्णतेचा कहर सुरू आहे. उष्णतेचा कहर आणि वृक्षतोडीची लहर नेत्यांच्या कंत्राटी पिलावळांना पोसण्यासाठी नवनवीन शक्कल लढविल्या जात आहेत. दररोज सातारा ओरबडला जात आहे. सातारा जिल्हा निमुटपणे सहन करत आहे. पण वाईकरांनी याच्या विरोधात लढा सुरू केला आहे. हा लढा साताऱ्याचा इतिहास वाचविण्यासाठी आहे. साताऱ्याचे सौंदर्य वाचवण्यासाठी आहे. वाई- सुरूर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे 500 वृक्षांची कत्तल केली जाणार होती. वाईकरांनी याच्या विरोधात लढा सुरू केला आहे. वाईकरांनी अगदी बजावून सांगितले आहे की रुंदीकरणामुळे स्थानिकांना फायदा होणार नाही. आधीच ग्लोबल वार्मिंग हवामान बदल या दृष्टीने वृक्ष लागवड व संवर्धन अतिशय महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. रुंदीकरणामुळे होणारी वृक्षतोड अनावश्यक आहे. पर्यटक या रस्त्याचा वापर निसर्गाचा आनंद घेण्यासाठीच करत असतात. रुंदीकरणामुळे वृक्षतोड यामुळे निसर्गाचा आनंद हिरावला जाणार आहे. याचा परिणाम पर्यटनावर होणार आहे.
या रस्त्यावरील वृक्ष हे अनेक पशुपक्षी यांचे नैसर्गिक अधिवास असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या रस्त्यावर आज अखेर वाहतुकीचा कोणताही प्रश्न उद्भवला नाही. वाहतूक कोंडी झाली नाही. याआधी 48 वृक्ष तोडण्यात आले होते त्याच्या बदल्यात 500 वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले होते. त्याचे पालन आज अखेर झालेले दिसत नाही त्यातच नवीन वृक्षतोड पर्यावरणाला परवडणार नाही असेही निवेदनात म्हटले आहे. वृक्षतोड रद्द करण्यासाठी गरज वाटल्यास रस्ता रुंदीकरणाचे काम रद्द करण्यात यावे असे पर्यावरण प्रेमी वाईकरांनी ठणकावून सांगितले आहे. झालेले आंदोलन प्रशांत डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. वाईकरांनी पर्यावरण प्रेमींनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गेल्या काही वर्षांमध्ये साताऱ्यात वनव्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेली वृक्षतोड भयानक आहे. त्यानंतर पुन्हा वृक्ष लागवड प्रशासन विसरून गेले आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातील वृक्षतोड हा ऐरणीचा मुद्दा झाला आहे. साताऱ्यातील कथित पर्यावरण प्रेमी कोणत्या बिळात लपून बसले आहेत हे आज अखेर समजू शकले नाही. पुरस्कारांच्या वेळी मात्र बिळातील पर्यावरण प्रेमी बिळातून बाहेर येतात. अलीकडच्या काळात पर्यावरण प्रेमींना पुरस्कार त्यांचे काम न पाहता त्यांची संस्था संघटना पाहून दिले जातात हे मात्र दुर्दैवी आहे.
खैराची अवैध वाहतूक रोखण्यात वनविभाग अक्षरशा अपयशी ठरला आहे. वन विभागामार्फत खैराची वाहतूक आणि वनवा थांबविण्यासाठी काय योजना राबवल्या जातात हे मात्र गुलदस्त्यात आहे. बारामती मध्ये एका रस्त्यावर एका झाडासाठी रस्त्याला वळण देण्यात आले आहे. बारामती च्या विकासामध्ये कमीत-कमी वृक्षतोड झाली आहे. योगायोगाने साताऱ्यात पाच कॅबिनेट मंत्री आहेत. वृक्ष लागवडीची चळवळ जिवंत करणार का? साताऱ्यातील पर्यावरणाचे निसर्गाचे रक्षण करणार का?