राहुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासात भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळल्या…

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील फार्म हाऊसवर असलेल्या कामगाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लिंबे चोरून नेल्याची घटना आज (दि.१५) पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास घडली होती.राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्या नंतर अवघ्या २४ तासात राहुरी पोलिसांनी चारही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

             याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात शिवाजी जनार्दन सागर (वय ६०, रा. मल्हारवाडी, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि. १५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील फार्म हाऊसवरील कामगाराला चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याला जिवे मारण्याच्या तयारीनिशी त्याच्याकडे असलेल्या धारदार हत्यारांनी फार्म हाऊसची कडी-कोयडा तोडून आत प्रवेश केला आणि फार्म हाऊसमधील बत्तीस हजार रुपये किमतीचे लिंबे चोरून नेले आहे.शिवाजी सागर यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात बीएनएस ३३१(६), ३०५(A), ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. 

             

  सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.काँ.जानकीराम खेमनर यांच्याकडे दिलेला असताना गोपनिय बातमीदारा मार्फत आरोपींची माहिती काढली असता १) विजय भिकाजी झावरे,२) अनिल उत्तम विधाते,३) चंद्रकांत मोहन बर्डे, ४) ज्ञानेश्वर दादा घनदाट (सर्व रा. ताहाराबाद ता.राहुरी) या सर्वांनी मिळून चोरी केल्याचे समजले. या चौघांना राहुरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांना राहुरी न्यालयात हजर केले असता आरोपी क्रमांक १ ते ३ यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.आरोपी क्र४ यास न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली आहे.गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार व चोरी केलेले चारशे किलो लिंबाचा शोध सुरु आहे.

         सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे,यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ,पोहेकॉ जानकीराम खेमनर,रामनाथ सानप, पोना.जालिंदर साखरे, पो.हे,कॉ.शकुर सय्यद पो.कॉ.अविनाश दुधाडे यांनी केला आहे.

 ■ आमच्या बागांमधून वारंवार चोऱ्या- सागर

             राहुरी पोलिसांनी पकडलेल्या चार चोरांनी आमच्या भागात उच्छाद मांडला आहे.यातील दोन आरोपी हे अट्टल गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे.यापूर्वीही त्यांनी आमच्या बागांमधून वारंवार चोऱ्या केलेल्या आहेत. परंतु त्यांना वेळोवेळी समज देऊनही ते चोऱ्या करण्याचे प्रकार थांबवत नव्हते. दि.१५ रोजी पुन्हा लिंबे चोरून नेताना निदर्शनास आले आणि त्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दाखल केली आहे.या चोरांना कडक शासन झाले पाहिजे.

शिवाजी सगर,     प्रगतशील शेतकरी, मल्हारवाडी

  ■  राहुरीच्या चारही घाटांतून प्रवास करणे जिकीरीचे?

            राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी घोरपडवाडी घाटात एका तरुणाला गावठी कट्टा लावून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल लुटण्याचा प्रकारही घडला होता. मल्हारवाडी घाट, वडनेर घाट, ताहाराबाद घाट तसेच कानडगाव घाट या घाटांमध्ये देखील चोरांचे टोळके असल्याचे प्रवासी व वाहनचालकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.प्रवासी व वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेला पोलिसांनी आळा घालणे गरजेचे असल्याचे प्रवासी व वाहनचालकांमधून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here