राहुरी वकील दाम्पत्य खून खटला ;माफीच्या साक्षीदाराने ओळखल्या घटनेतील वस्तू

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

          राज्यामध्ये गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील दोन वकिलांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या दिवशी नगर येथील न्यायालयामध्ये सुरू झाली. सरकारी पक्षाच्या वतीने या घटनेतील माफीचा साक्षीदार त्याची आज पुन्हा न्यायालयासमोर तपासणी झाली व त्याने या हत्याकांडाचा घटनाक्रम पुढे सांगून यावेळी मयत व्यक्ती चे एटीम कार्ड, सोन्याच्या बांगड्या व इतर वस्तू ओळखले. आम्ही या दोघांना पोत्यात बांधून, दगड बांधून, विहीरीत फेकून त्याची हत्या केल्याचे कबूल केले, व मला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याची कबुली जवाब पण दिला असल्याचे नगरच्या मुख्य जिल्हा व  सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर मांडला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याची तपासणी घेतली. दरम्यान माफीच्या साक्षीदाराची उलट तपासणी आज सुरू झाली त्यामध्ये अनेक प्रश्न त्याला वकिलांनी विचारले.

       

राहुरी न्यायालयात वकीली व्यवसाय करणारे आढाव दाम्पत्यांचा खून झाला. या दोघा पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहीरीत आढळला होता. ॲड. राजाराम जयवंत आढाव (५२) व ॲड. मनिषा आढाव (वय ४२) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

           या प्रकरणात  सरकारी साक्षीदा हर्षल दत्तात्रय ढोकणे हा आरोपी आणि माफीचा साक्षीदार आहे.आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग,भैय्या ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम महाडीक, बबन सुनील मोरे  यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. या हत्याकांड प्रकरणांमध्ये आरोपी हर्षल ढोकणे याला काल त्रास झाला होता. मंगळवार ता.10 रोजी त्याची पुन्हा सरतापासणी सुरू झाली. वकील निकम यांनी त्याला अनेक प्रश्न उपस्थित केले. व त्याला वकील उज्वल निकम यांनी प्रश्न विचारत तुम्ही घटना कशा पद्धतीने केली याचा उलगडा करा असं म्हणत त्यांनी प्रश्न विचारले. वकिलांना आम्ही त्यांच्या घरात नेल्यानंतर दुपारच्या सुमाराला त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यानंतर किरण दुशिंग याने वकिलांना नीट बोला, असा दम दिला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी या दोघांना पहिल्या मजल्यावर नेले. तिथे किरण याने वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी वकिलांनी मॅडम कडे पैसे आहे. मॅडम कडून किल्ली घेण्यात आली, तोपर्यंत पुन्हा एकदा पैशाचा तगादा केला गेला. 

        यावेळी वकील आढाव यांनी तुम्ही मला अगोदर फिर्याद दाखवा,असे त्यांना सांगितले. यानंतर किरण हा बाहेर निघून गेला. आम्ही सर्वजण या दोघांसोबत थांबलो होतो. त्याच वेळेला त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांनी आम्हाला तुम्ही आम्हाला यांच्या तावडीतून सोडवा, मी तुम्हाला पैसे देईल असे सांगितले. मात्र हेच बोलणे किरण याने ऐकले नंतर किरण याने आम्हाला शिवीगाळ करत धमकावले पैसे घेतले तर याद राखा असे तो आम्हाला म्हणाला. परत आम्ही या वकील पती-पत्नीचे हात बांधले व तोंड सुद्धा आम्ही बांधले असे हर्षल याने यावेळी सांगितले.

 त्यानंतर आम्ही या दोघांना घेऊन वकिलांच्या पांढऱ्या गाडीतून ब्राह्मणीच्या बाजूला असलेल्या कॅनलच्या दिशेने गेलो.  त्यावेळी मी घरी फोन कारण्यासाठी मोबाईल चालू केला असता माझा मित्र शुभम गायकवाड याचा मला फोन आला. व त्याने मला तू दिवसभर कुठे आहे, तुझा फोन बंद लागत होता असे विचारण्यात आले.  मी कारखान्यांमध्ये काम करत होतो, असे सांगितले व फोन बंद केला. नंतर घरी फोन लावला मी कारखान्यामध्येच दुसऱ्या शिफ्टला थांबणार आहे . असे हर्षल याने आपण घरी सांगितले. त्यानंतर आम्ही फोन बंद करून वांबोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानाच्या बाजूला आम्ही गाडी घेऊन या दोघांना घेऊन गेलो. त्या ठिकाणी किरण याने पुन्हा पैशाची मागणी केली.  तुम्ही आम्हाला किती पैसे देणार, अशी विचारणा केली. त्यावेळी वकील आढाव यांनी माझ्याकडे कर्ज झाले आहे. पैसे मॅडमच्या खात्यामध्ये आहेत.ते सुद्धा 60 ते 65 हजार रुपये असतील, असे त्यांनी सांगितले. त्यावेळेला आम्ही त्यांचा मोबाईल तपासला असता त्यांच्या मोबाईल मध्ये दोन ते तीन खाते दिसून आले. त्यामध्ये मनीषा आढाव यांच्या वडिलांचे सुद्धा खाते त्यामध्ये दिसून आले. त्यानंतर एटीएम वरून त्यांच्या वडिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले. त्यानंतर एटीम पिनकोड नंबर काय आहे, अशी विचारणा त्यावेळेस केली ते एसबीआयचे एटीएम कार्ड होते ते कार्ड तू ओळखतो का असे विचारणा वकील उज्वल निकम यांनी केल्यानंतर त्याने हो असे सांगितल्यावर न्यायालयासमोर हे कार्ड दाखवण्यात आले होते त्याने ते ओळखले.

           यानंतर या वकिलांना दोघांना बांधून पुन्हा ब्राह्मणी या ठिकाणी परत आणले व पैशाचा तगदा त्यांना लावला जर पैसे दिले नाहीत तर आम्ही बलात्कार करू, अशी धमकी सुद्धा दिली. त्यानंतर हातामध्ये असलेले सोन्याचे ब्रेसलेट हे काढून घेण्यात आले. त्यानंतर किरण दुशिंग याने शुभम महाडिक, सागर खांडे व मी अशांना मिळून त्यांचे पुन्हा तोंड बांधण्यास सांगितले. त्यानंतर शुभम कडून किरण याने प्लास्टिकची पिशवी घेऊन यायला सांगितले. त्यानंतर डोक्यामध्ये त्या पती-पत्नीच्या पिशवी घालून त्यांना चिकटपट्टी लावण्यात आली. गळ्यापर्यंत त्यांना प्लास्टिकची पिशवी ही घालण्यात आली ,त्याच वेळेला त्यांची पत्नी मनीषा आढाव यांनी माझ्या बाबाना मारले,आता मला मारून टाका असे म्हणल्यावर बबन मोरे, सागर खांदवे याने तशीच पिशवी मॅडमच्या डोक्यामध्ये घातली ती पिशवी मनीषा यांनी चावली त्यानंतर त्यांना जोरदारपणे मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या आम्ही गाडी मेन रोडच्या दिशेने घेत असताना त्या वेळेला किरण येणे आम्हाला दगड गोळा करून गाडी टाकायला सांगितले व मी व सागर याने ते काम केले थोडा वेळ गेल्यानंतर हे दोघेही बेशुद्ध पडलेले होते.

         त्याच वेळेला दुसरीकडे किरण यांनी वकिलांचा मोबाईल हा फोडला व शेजारी असलेल्या झाडांमध्ये तो फेकून दिला.यानंतर आम्ही हॉटेल पॅलेस समोर त्या ठिकाणी आम्हाला दोन गोण्या घेण्यास सांगितल्या,त्या आम्ही घेतल्या व त्यानंतर आम्ही कुक्कडवेढे  रोडला बिरोबा मंदिराच्या पाशी गाडी थांबवली या ठिकाणी गोण्यांमध्ये आम्हाला दगड टाकण्यात सांगितले. आम्ही दगड गोण्यामध्ये भरल्यानंतर त्या ठिकाणी मॅडमचा मोबाईल हा फोडून तो नाल्यामध्ये टाकण्यात आला असल्याचे हर्षल याने यावेळी सांगितले. त्यानंतर बबन मोरे यांच्या घरापाशी आल्यानंतर तेथून त्यांनी साड्या घेतल्या व त्यानंतर हे गावच्या स्मशान भूमी पाशी गेले, त्या ठिकाणी दगडाने भरलेल्या गोण्या आणून ठेवल्या, नंतर साडी आणून ठेवली या दोघांनाही विहिरीजवळ आणले किरण याने वकिलांना साडीने पायापासून मानेपर्यंत बांधले. त्यानंतर आम्ही तिघांनी त्यांना बांधले. दगडाच्या गोण्या त्यांच्या शरीराला बांधल्या काळ्या ओढणीने वकिलांचे पाय बांधले व पांढऱ्या रंगाच्या साडीने मॅडमला सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही बांधले असल्याचे हर्षल याने सांगितले.

           यानंतर आम्ही चौघांनी मिळून त्यांना विहिरीमध्ये फेकून दिले. त्यानंतर किरण याने तुम्ही घाबरू नका ते काही वरती येणार नाहीत. अगोदर वकिलांना नंतर त्यांच्या मॅडमला आम्ही टाकले असल्याचे त्यांने सांगितले. त्यानंतर आम्ही रॉयल पॅलेस या ठिकाणी आलो त्या ठिकाणी किरणची गाडी होती, या ठिकाणी किरण याने वकिलांची गाडी आपल्याला पुन्हा न्यायालयाच्या समोर घेऊन ठेवायची आहे, असे सांगून राहुरी न्यायालयासमोर आम्ही ही गाडी घेऊन आलो. त्या ठिकाणी उभी केली असताना तेथून पोलीस जात असल्याचे दिसले. आम्ही तात्काळ पळ काढला त्यानंतर भैय्या खांदे याला आम्ही सोडले. त्यानंतर त्यानंतर इतरांना त्यांनी आपापल्या घरी सोडले अशी सर्व हकीगत त्याने या हत्याकांडाच्या संदर्भामध्ये न्यायालयासमोर मांडली.

 

माफीच्या साक्षीदाराची उलट तपासणी

            माफीचा साक्षीदार हर्षल याची उलट तपासणी आज नाशिकचे वकील सतीश वाणी यांनी घेतली. त्यांनी हर्षल याला तू कोणत्या गावांमध्ये राहतो तुझ्या घरी कोण कोण असते, तू कुठे काम करतो, या पुन्हा संदर्भ मध्ये तुझ्या समवेत कोण कोण होते, त्यांना तू ओळखतो का, हा गुन्हा पाहिल्यानंतर तू पोलिसांना काय माहिती दिली पोलिसांनी तुझा वेळेमध्ये जबाब घेतला का?, न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर जबाब द्यायचा होता त्या वेळेला तो सर्व माहिती त्यांच्या समवेत सांगितलेली नाही. यासंदर्भात त्यांनी उलट प्रश्न त्याला विचारल्यानंतर हर्षल येणे मला काही सर्वच आठवते असे नाही. मी माहिती देताना त्या वेळेला थोडक्यात माहिती त्यांना दिली असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या समोर दिलेल्या जबाब मध्ये म्हणले आहे. तू जो काही मोबाईल वापरतो हा तुझा नाही ते सिम कार्ड तुझे नाही. असे त्यांनी विचारल्यानंतर हा मोबाईल मामाच्या नावाने होता माझ्या गावांमध्ये जिओचे लोक आले त्यावेळी त्यांनी आमचा नंबर हा जिओ मध्ये बदलून घेतला असल्याचे त्यांनी  मध्ये म्हणले आहे. न्याय दंडाधिकारीच्या समोर जो जवाब दिलेला आहे तो चुकीचा दिला आहे असे विचारल्यानंतर त्याला व्यवस्थित रित्या उत्तर देता आले नाही. आरोपीचे वकील वाणी यांनी यावेळी न्यायालयाला आवर्जून सांगितले व याची नोंद घ्यावी अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. आरोपीचे वकील वाणी यांनी जे काही काल मुद्दे हर्षल याने न्यायालय समोर सांगितले, त्यावर अनेक प्रश्न उत्तरे यावेळी घेण्यात आली काहींची उत्तरे देण्यात आली तर काही माहीत नसल्याचे सांगण्यात आले.

    ■ पैसे द्या नाहीतर बलात्कार करेल!

          आढाव पती-पत्नीला जेंव्हा या आरोपींनी खोटे सांगून बनाव करून त्यांना डांबले व क्रूरपणे त्यांची हत्या केली, त्यावेळेला ते पैसे देत नव्हते. तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही अत्याचार, बलात्कार करू असे म्हणत त्यांना धमकी दिली.पैशाची मागणी अवास्तव असल्याने आज येवढी रक्कम नाही.असे सांगितले 

     ■ मला पश्चाताप झाल्याने दिला कबुली जबाब

            केलेल्या हत्याकांडाचा पश्चाताप मला झाला, त्याच वेळेला मी माझ्या मित्राला ही सगळी बाब सांगितली व मला आता कबुली जवाब द्यायचा आहे असा मी निश्चय केला व त्यानंतर मी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचा समोर माझा कबूली जवाब दिला असल्याचे हर्षल याने न्यायालयाला सांगितले. त्याला न्यायालयाने हा जवाब दाखवल्यावर हा जबाब मी दिला असून ही माझी स्वाक्षरी असल्याचे त्यांनी कबूल केले.

    ■त्या ओळखल्या वस्तू

         माफीचा साक्षीदार याला या घटनेमध्ये वापरलेला रुमाल तसेच महिला वकील यांच्या हातामध्ये असलेली ब्रेसलेट यावेळी या माफीच्या साक्षीदार हर्षल याला दाखवण्यात आले व त्याने ती न्यायालयासमोर ओळख असल्याचे सांगितले.

     ■मिळाले दिले दहा हजार, पश्चातापत ते ही जाळले

         वकील दाम्पत्याची हत्या केल्यानंतर आम्हाला चार ते पाच लाख रुपये मिळणार होते. मात्र आम्हाला किरण याने फक्त दहा हजार रुपये प्रत्येकी दिले असल्याचे हर्षल याने आपल्या जवाब मध्ये म्हणले आहे. मला केलेल्या घटनेचा पश्चाताप झालेला होता. त्यामुळे मला मिळालेले पैसे मी तात्काळ जाळून टाकले असेही त्याने आज न्यायालयासमोर सांगितले.

   ■ आज पुन्हा दोन्ही वकिलांमध्ये शाब्दिक चकमक

        न्यायालयमध्ये युक्तिवाद सुरू असताना वकील उज्वल निकम यांनी काही प्रश्न विचारल्यानंतर आरोपीचे वकील सतीश वाणी यांनी त्यांना अटकाव केला,त्या वेळेला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. निकम यांनी मला अधिकार आहे असे सांगितले. त्यानंतर उलट तपासणीच्या वेळी वाणी हे आरोपीला प्रश्न विचारताना निकम उत्तर द्यायला लागल्यावर यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व पुन्हा या दोघांमध्ये कडाक्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here