सोलापूर: घरी वीजेचे मीटर बसवण्याच्या निमित्तानं ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. लग्नाचा लकडा लावताच टाळाटाळ केली. चौकशी अंती तो विवाहित असल्याचे समजल्यानं पिडितेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानं गुन्हा नोंदला आहे.मुकुंद दत्तात्रय भगरे (वय- ३०, रा. अकोले मंद्रूप, ता. द. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे.
यातील पिडित तरुणी ही एका खासगी ठिकाणी नोकरीस आहे. २१ जानेवारी २०२२ रोजी पिडितेच्या घरी मीटर बसवण्यासाठी वायरमन आले होते. त्या निमित्ताने वायरमन असलेल्या मुकुंद भगरे याने कामासाठी पिडितेचा मोबाईल नंबर घेतला. पुढे ओळख वाढवून आपलेही लग्न झालेले नाही म्हणून लग्नाचे मागणी केली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
तुळजापूरला दर्शनाला जाण्याच्या निमित्ताने एका हॉटेलमध्ये, सावळेश्वरजवळ एका हॉटेल तसेच विविध ठिकाणी इच्छेविरुद्ध आपण लग्न करणार आहोत म्हणून पिडितेशी लगट करुन अत्याचार केला. लग्नासाठी विचारणा करीत असताना आरोपीने टाळाटाळ सुरु केली. पिडितेने आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो विवाहित असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पिडितेने घरी सारा प्रकार सांगितला. त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने मुकुंद दत्तात्रय भगरे (वय- ३०, रा. अकोले मंद्रूप) या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.