मेणवली : मेणवली (ता. वाई) येथे काल रात्री पावणेएकच्या सुमारास दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी भूषण शरद कोचळे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून कपाटातील ४ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने लुटले.
याबाबत वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी आणखीही काही घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. शरद कोचळे याच्या घरातील सर्व जण रात्री झोपले असताना अचानक चोरट्यांनी दरवाजा फोडून घरात प्रवेश केला.
धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला. त्यामुळे मेणवलीसह वाईच्या पश्चिम भागात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वाई पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलावल्याचे समजते.
या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरू होते. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज तपास करीत आहेत.