पाच जण ताब्यात; भाविकांमध्ये घबराट
शिखर शिंगणापूर : शिखर शिंगणापूर यात्रेदरम्यान दोन गटांत दगडफेक झाली तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. ऐन यात्रेत हा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे तर गर्दीचा फायदा घेऊन सुमारे पंधरा जण पसार झाले.
शिखर शिंगणापूर येथे यात्राेत्सव सुरू असून, यात्रेतील ध्वज बांधण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. ५ रोजी दुपारी ४:३०च्या सुमारास सुरू होता. याचवेळी पाळणे असलेल्या ठिकाणी दोन गटांमध्ये बाचाबाची सुरू होती. त्याठिकाणी जवळपास २० ते २५ लोकांचा जमाव होता. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली.
जमावातील काहींनी दोन कारच्या (एमएच २५ बीए ८०२४) आणि (एमएच १४ बीआर ९२११) काचा फोडल्या. या राड्यामुळे अनेक भाविक घाबरून सैरावैरा पळू लागले. दोन्ही गटांमध्ये नेमके काय घडले हे कोणालाही समजत नव्हते.
पोलिसांनी अमोल बाबाजी काळे (वय २८), अजय अशोक काळे (वय २०, दोघेही रा. मोहा, ता. कळम, जि. धाराशिव), रामा जिरंगा काळे (वय ३७, तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव), लालासोा सुबराव काळे (वय २०, डॉकरी, ता. धाराशिव), नाना जम्या काळे (वय ५७) यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.