एमजीएमच्या विद्यार्थ्याची यशाला गवसणी..!

0

नांदेड प्रतिनिधी 

एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडचा विद्यार्थी ओमकार सोळंके बिटेक स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन नुकताच मिलिटरी ऑफिसर केडरची ट्रेनिंग  डेहराडून येथून पूर्ण करून भारतीय सैन्यदलात दाखल आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट.  आई- वडील अल्पभूधारक शेतकरी. बारावी नंतर त्याने स्थापत्य अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथून प्राविण्यासह पूर्ण केले. मनात देशसेवेचे वेड होतेच. तो नांदेड- भोकर  रोडवरील खेरगाव या त्याच्या गावाहून दररोज एसटी ने ये जा करत असे.तो महाविद्यालयात निर्धारित वेळेच्या लवकर यायचा कारण बस लवकर येत असे,ग्रंथालयातही तो दिवस दिवस अभ्यास करत असे. वर्गातही  हुशार विद्यार्थ्यांत त्याची गणती होत असे. 

एमजीएम मध्ये शिक्षण घेत असतानाच त्याच्या आईचे दुखत निधन झाले,अनेक दिवस आई दवाखान्यात दाखल होती,या परिस्थितीतही त्याने शिक्षण घेतले.महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी, शिक्षकांनी त्याला सावरले तसेच महाविद्यालयाच्या डायरेक्टर डाॅ.गीता लाठकर यांनीही त्याला सर्वतोपरी मदत केली,कुठलीच अडचन येऊ दिली नाही हे विशेष.  अशा कठीण परिस्थितीतही त्याने  ‘मला मिलिटरी अभियंता व्हायचे आहे ‘ ही  जिद्द सोडली नाही.दोन वेळेस तो या ऑफिसर परीक्षेत नापासही झाला पण तिसर्‍या प्रयत्नात यशस्वी झाला. अखेर त्याने१३ डिसेंबर २०२४ रोजी त्याचे एक वर्षाचे खडतर मिलिट्री अधिकारी प्रशिक्षण  डेहराडून येथील मिलिटरी अकादमी मधून यशस्वीरीत्या पूर्ण केले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या अंतिम परेड प्रोग्रॅमसाठी त्याने महाविद्यालयाच्या डायरेक्टर डाॅ.गीता लाठकर यांना उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आणि त्याच्या वरिष्ठांकडून तशी परवानगीच मिळवली. तेवढ्याच उत्साहाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व कामे बाजूला सारत वेळ काढून एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डायरेक्टर डाॅ.गीता लाठकर पुणे ते डेहराडून हे मोठे अंतर हवाई मार्गाने पार करून तिथे पोचल्या.  परेड समारंभास उपस्थित राहून आपल्या विद्यार्थ्याचा आनंद त्यांनी वाढवला आणि त्याच्या आईची उणीवही भरून काढली. आपल्या विद्यार्थ्याच्या बाहूवर भारतीय सैन्याचे स्टार लागणाऱ्या क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद  अवर्णनीय असल्याची भावना प्राचार्या डाॅ.गीता लाठकर यांनी  व्यक्‍त केली. 

तसेच ओमकार ने इथपर्यंत येण्यासाठी खूप परीश्रम घेतल्याचेही त्या म्हणाल्या.  एमजीएम ने देशाला एक शूर सेनिक दिल्याची भावना यावेळी प्राचार्यानी व्यक्‍त  केली. यावेळी भारतीय सेनेच्या तीन हेलिकॉप्टरमधून पुष्प पाकळ्यांचा नव्या ऑफिसर्सवर वर्षाव करण्यात आला तसेच सोबत मिलिट्री बँडची देशप्रेमी धुन  ऐकून भारतीय सेनेचा आणि देशाचा अभिमान वाटत असल्याचे  भावनिक उद्गारही प्राचार्यानी या प्रसंगी काढले. तसेच उपस्थितीचा हा प्रसंग त्याच्या हृदयावर कायमच कोरलेला असेल असे त्या म्हणाल्या. 

विद्यार्थ्याच्या   आनंदासाठी कार्यक्रमास स्वखर्चाने उपस्थित राहणारे प्राचार्य म्हणजे गुरू – शिष्य संबंध जसा रेशमाचा बंध. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कथा असून  या कथेचे एमजीएम महाविद्यालयात अनेक साक्षीदार आहेत.  ओमकार ची पुढील पोस्टींग  इंजिनिअर्स डिव्हिजन लेह- लडाख ला असणार आहे असे समजते , या यशाबद्दल  ओमकार सोळंके याला संस्थाध्यक्ष कमलकिशोर कदम, प्राचार्या डाॅ.गीता लाठकर,विविध विभागप्रमुख,शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here