पालकमंत्री संदीपान भुमरेंचा पाठपुराव्याला मोठे यश.
पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी):पैठण तालुक्यात Paithan taluka पावसाने मोठा खंड दिल्यामुळे पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती drought-like situation निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी यादीत पैठण तालुक्याचे नांव जाहीर न झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने पैठण तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी रोहयोमंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर शासनाने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली असून शेतकऱ्यांना याचा लवकरच लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले.
गत पावसाळ्यात तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिली. अडीच ते तीन महिन्यांत पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याअभावी जळून गेली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. पैठण तालुक्यातील पैठण, आडुळ, बालानगर, नांदर, लोहगाव, ढोरकिन, बिडकीन, पाचोड, विहामांडवा व पिंपळवाडी या महसूल विभागात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळी निर्माण झालेली आहे. शासनाने इतर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला मात्र पैठण तालुका डावलल्यामुळे नाराजी पसरली होती. याबाबत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शासनास तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणून देत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी पाठपुरावा केला. अखेर शासनाने पैठण तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. दि. ३१ ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ४० तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि. ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे अशा महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. या शासन निर्णयाने शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदींचा समावेश आहे
*** दैनिक लोकप्रभात आणि Press Alert परिवाराकडून सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! *****