पैठण,(प्रतिनिधी): पैठण तालुक्यासह ग्रामीण भागात दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस हा सण मोठ्या उत्साहात गौमातेचे पुजन करून साजरा करण्यात आल्याची माहिती शेतकरी विनोदकुमार मुंदडा यांनी दिली.
अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असे मानले जाते.
यंदा सोमवार दिं. २८ ऑक्टोबर रोजी रमा एकादशीला वसुबारस असून यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे . समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
पैठण तालुक्यातील दक्षिण जायकवाडी जवळील तेलवाडी येथे शेतकरी विनोदकुमार मुंदडा यांनी वसुबारस सण निमित्ताने गाईसह वासरांची विधीवत पूजा करून नैवेद्य दाखवून सण साजरा केला.