पैठण,(प्रतिनिधी): पैठण येथील मूकबधिर निवासी विद्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. महावीर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित ओंकार मूकबधिर निवासी विद्यालय पैठण येथे जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया पैठण शाखेचे शाखाधिकारी श्री पांडे, बुलढाणा अर्बन बँक पैठण या शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश घुगे, केंद्रप्रमुख श्रीमती मंगल मदने, संस्थेचे सचिव सतिश माहोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका पुजा जाधव यांनी दीप प्रज्वलित करून हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यालयातील दिव्यांग कर्मचारी अशोक शिंदे यांचा यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ अर्चना जाधव यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. दिव्यांग बांधवांच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून विविध प्रकारचे उपक्रम हाती घेऊन या दिव्यांग बांधवांना सर्वसामान्य जनतेत जनजागृती निर्माण करण्यासाठी, दिव्यांग चा सन्मान होण्यासाठी, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिव्यांग दिन साजरा करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका पुजा जाधव यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे शाखाधिकारी श्री पांडे यांनी या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यांच्या समस्या व भावना समजून घेतल्या, व त्याचबरोबर कर्णबधिर मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ही संस्था उत्कृष्ट सामाजिक कार्य करत आहे. बुलढाणा अर्बन बँकेच्या अध्यक्षांनी या मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. विद्यालयाच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक गणेश फटांगडे यांनी केले, प्रास्ताविक श्रीकांत जगदाळे यांनी केले तर प्रसाद आव्हाड यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.