छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातील रेणुका माता मंदिराजवळ असलेल्या एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारात चोरटे सुमारे साडेअकरा लाखांचे दागिने घेऊन पसार झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर रोडवर सुरेश बाबुराव कुलथे यांचे सराफा दुकान आहे.
दरम्यान रात्री संपूर्ण दिवसभरातील झालेल्या व्यवहाराचा सर्व हिशोब करून ते घरी जाण्यासाठी निघाले. याचवेळी हा सर्व प्रकार घडला आहे. घरी निघत असताना दोनजण दुकानात आले. त्यांनी बंदूक काढत सुरेश कुलथे यांना धाक दाखवत दुकानातील दागिने घेऊन पसार झाले.
दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत चोरटयांनी ११ लाख ६४ हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी कुलथे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलीस आता तपास करत आहेत.