मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील पोलीस लाठीमाराचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत.
राज्यातील काही शहरांत मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) बंदच आवाहन केलं आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रामुख्याने समावेश आहे.तसंच, राज्यभर स्थानिक पातळीवरही निषेध नोंदवण्यासाठी लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे, राजकीय नेते अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेत आहेत.
शनिवारी (2 सप्टेंबर) आमदार रोहित पवार, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जखमी आंदोलकांची भेट घेतली आणि आंदोलकांशी संवादही साधला. शुक्रवारी (1 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. यात आंदोलक आणि पोलीस दोघेही जखमी झाले आहेत.
सोमवारी (4 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर बंद ठेवण्याचं आवाहन मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी केलं आहे. “सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान शहर बंद ठेवण्यासाठी सहकार्य करावं. आम्हाला कोणतीही तोडफोड करायची नाही. आम्हाला शांततेत हा बंद पार पाडायचा आहे,” असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबत देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि दादर परिसरात मराठा आरक्षण आंदोलन पदाधिकाऱ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात येणार असल्यांच सांगण्यात येत आहे.