विद्यार्थ्यांच्या अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने

0

फुलंब्री :- 

विद्यार्थ्यांच्या अभिनय प्रतिभेला उजाळा देण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वाकोद ता-फुलंब्री  येथे ‘ बोलणारी नदी ‘ या नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. आनंददायी शनिवार अंतर्गत दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी  इयत्ता चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ही नाटिका एवढ्या उस्फूर्तपणे सादर केली की उपस्थितांनी प्रचंड दाद दिली.या नाटिकेत आरुषी ताठे या चिमुकलीने बहारदार निवेदन केले .

लीलाच्या भूमिकेत स्वराली ताठे ने आपला अवखळपणा दाखविला. देवयानी ताठे या दहा वर्षाच्या बालिकेने ऐंशी वर्षांच्या माई आजीची भूमिका एवढ्या तन्मयतेने साकारली की एखाद्या कसलेल्या कलावंतालाही मागे टाकावे. आईच्या भूमिकेत मानसी लहाने तर नीलाताईच्या भूमिकेत काजल कापडे यांनी जीव ओतला. भोला मामाच्या भूमिकेतील अरिहंत ताठे याने सर्वांना मनसोक्त हसविले.’ बोलणारी नदी’  या नाटिकेचे दिग्दर्शन उज्वलकुमार म्हस्के यांनी परिपूर्णपणे केले.

या नाटिकेतील विद्यार्थ्यांच्या या अभिनया बद्दल मंगल वेळे,मंगला पाटील,संगीता वाढोनकर,नितीन शेळके,स्वप्नील पाटील,रुपाली घुगे यांनी प्रशंसा करून शाबासकी दिली. या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील उपजत अभिनय कौशल्य असते. हे या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्वांगसुंदर अभिनयातून सिद्ध करून दाखविले. याबद्दल या नाटिकेत सहभागी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here