संत एकनाथ महाराजांच्या समाधीस चंदन ऊटी लाऊन वसंत पूजा संपन्न

0

पैठण,दिं.४.(प्रतिनिधी):श्री संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र व वैशाख या दोन महिन्यातील प्रत्येक दशमीच्या दिवशी श्रींचे समाधीस चंदन उटी लावण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यानुसार चैत्र वद्य दशमी, शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ७:३० वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्र घोषात ही पूजा संपन्न करण्यात आली.

नाथवंशज ज्ञानराज गोसावी यांनी ऊटीसाठी लागणारे चंदन उगाळून नाथ समाधीची विधीवत पूजा केली. समाधीस विड्याच्या पानांची व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी शेकडो भाविकांनी कैरीचे पन्हे व फळ या ठराविक प्रसादाचा लाभ घेतला. नाथवंशज सालकरी श्री सरदार महाराज गोसावी, डॉ. श्री मेघशाम महाराज गोसावी व सेवाधारी मंडळीनी सर्व व्यवस्था पाहिली. 

  यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा जास्त आहे. वैशाख महिन्याच्या शुद्ध व वद्य अशा दोन ऊटी पूजा पुढील महिन्यात संपन्न होणार आहेत. एकनाथ महाराजाना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पादुकावर चंदनाचा लेप लावल्या जातो. पूजा म्हणजे “यथा देहे तथा देवे” या न्यायाने करायची असते अर्थात आपण जशी आपल्या देहाची काळजी करतो तशीच आपण देवाची काळजी करुन विधिवत उपचार करणे असा त्याचा अर्थ होतो. एकनाथ महाराज प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार आहेत त्यामुळे त्यांची पूजाही तशीच होणे अपेक्षित असल्याने हा उपचार विधी करण्यात येत असल्याचे सालकरी नाथवंशज  योगिराज महाराज गोसावी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here