छत्रपती संभाजीनगर : साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून भूमीगत गटार योजना राबवली.यानंतर देखील शहरातल्या ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यात संभाजीनगरातील ज्योतीनगर या उच्चभ्रू भागातील नागरिकांनी थेट महापालिका प्रशासकांकडे बोट दाखवत आम्ही ड्रेनेजच्या घाण पाण्यातून लोटांगण घालायचे का, असा संतप्त सवाल केला आहे.
प्रभाग अभियंत्यांकडे तक्रार करून देखील दुरुस्तीकडे कानाडोळा केला जातो. शहरात नको त्या कामाचे डिजीटल फलकाद्वारे जाहिरातबाजीतून कौतुक सुरू आहे. मात्र अंतर्गत गल्लीबोळात लोक राहतात त्या अत्यावश्यक सेवांच्या दुरुस्तीकडे प्रभाग अभियंता आणि प्रभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. आठ दिवसांत दुरुस्ती केली नाहीतर ड्रेनेजच्या पाण्यात झोपून प्रशासनाचा निषेध केला जाइल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
रुग्णालयात गर्दी
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. एकीकडे कोरोना परतल्याची शहरात चर्चा सुरू आहे. शहर साथरोगाने फणफणल्याची साक्ष महापालिका व इतर सरकारी व खाजगी रुग्णालये देत आहेत. असे असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सर्वत्र बोंबोबोंब सुरू आहे.
मलनि:सारण वाहिन्यांचे काय?
दुसरीकडे केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शहरातील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणण्यासाठी तसेच स्वच्छता विषयक बाबींचा दर्जा उंचावण्यासाठी वित्तीय वर्षात सरकारकडून ४५ कोटीच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामधून प्रामुख्याने राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमांतर्गत शहरातील कारंजाचे नुतनीकरण व देखभाल दुरुस्ती, व्हर्टीकल गार्डन उभारणी, घन कचरा व्यवस्थापणात सुधारणा करणे आदी कामांचा विचार सुरू आहे. याआधी या कामांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. सोबतच याच निधीतून छत्रपती संभाजीनगरकरांना शुध्द हवेसाठी स्मार्ट सिटी मार्फत प्रदूषण विरहित पर्यावरण पूरक – इ बसेस खरेदी करण्याची तयारी केली जात आहे. मात्र जुनाटमलनिःसारण वाहिन्यांकडे कानाडोळा केला जात आहे.
शहरातले अनेक रस्ते ड्रेनेज आणि पिण्यापाण्याच्या विळख्यात सापडलेली आहेत. शहरातील ज्योतीनगर भागातील गल्ली क्रमांक – ४ चा सिमेंट रस्ता हा गटारगंगेत रुपांतरीत झाला आहे. याच भागातील हे घाण पाणी विश्वरूप चौकातून थेट दशमेशनगरातील डांबर शिल्लक नसलेल्या खड्डेमय रस्त्यातून वाहत अनेक खड्ड्यात तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्ग॔धी पसरलेली आहे.
संपूर्ण शहरात दुर्गंधी
एवढेच नव्हे, तर शहरातल्या ९ झोनमधील ११५ वार्डापैकी अर्ध्याहून अधिक भागाला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा पडल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत समोर आले आहे. सातारा – देवळाई , बीडबायपास तसेच शहरातील गुंठेवारी भागासह एन – १ ते एन – १३ या भागात पावलोपावली हा त्रास पाचवीलाच पुजला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्थानिक पातळ्यांवर करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक आमदार, महापालिकेतील माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी तसेच पालिका प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या छत्रपती संभाजीनगरकरांनी एकत्र येऊन वज्रमुठ बांधण्याची गरज आहे.
रोजचंच मढं त्याला कोण रडं
रेल्वेस्टेशन रोड – गोपाल टी चौकापासून एसएससी बोर्ड ते अहिल्याबाई होळकर चौकादरम्यान तसेच शहानुरवाडीतील जुनी एच.बी.एच. काॅलनीच्या प्रवेशद्वारातच गत तीन महिन्यापासून ड्रेनेज व जलव्यवस्था असुरळीत असल्याने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील विविध भागातील नागरिक महापालिकेसमोर मंडप टाकुन धरणे आंदोलने करतात, निषेध व्यक्त करतात. थेट ड्रेनेजच्या पाण्यामध्ये झोपून प्रशासनाचा निषेध देखील नोंदवल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वेस्टेशन येथील नव्या इमारतीकडे जाणारा रस्ता हा जवळपास ड्रेनेजच्या पाण्यामुळे पूर्ण व्यापला आहे.
रस्त्यांवर गटारगंगा
रस्त्यांवर ड्रेनेजचे पाणी त्याचबरोबर इथल्या रस्त्याचे ही मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने शहानुरवाडी टिळकनगर ते जवाहरनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील चेतकघोडा चौकात रस्ता पूर्ण बंद झाला आहे. परिणामी हा सर्व परिसर ड्रेनेजच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सातारा – देवळाईकरांच्या कामाकडे लक्ष द्या
शहरातील कोट्यवधीच्या भूमीगत गटार योजनेची वाट लावली. आता केंद्र शासन पुरस्कृत अमृत -२.० योजनेंतर्गत सातारा देवळाईसाठी मलनि:सारण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारने २७५ . ६८ कोटीची योजना मंजुर केली आहे. या योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुदान प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने चालू आर्थिक वर्षात १२७ कोटीची जमा व खर्चाची तरतूद केलेली आहे.
या योजनेकरीता महापालिका हिश्यापोटी ३० कोटीची तरतूद केलेली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच टेंडर काढून कामे केली जातील. पण योजनेत शहराच्या भूमीगत गटार योजनेची वाट आणि त्यात अनियमितता निर्णाण करणाऱ्या सेवा निवृत्त अधिकाऱ्याचाच समावेश करण्यात आला आहे.
सदर काम ठेकेदारामार्फत सुरू करताच वर्क ऑर्डर, टेंडरकाॅपी, योजनेतील खोदकाम किती लांबी रूंदीचे आहे. योजनेत अंतर्गत आणि मुख्य पाइप किती व्यासाचे आहेत. किती किलोमीटरचा योजनेत समावेश आहे. बांधकामात कोणत्या दर्जाच्या सिमेंट विटा आणि रेती आहे. योजनेत मुख्य मेनहोल आणि अंतर्गत मॅनहोलची गोलाई आणि खोली किती राहणार आहे. सांडपाणी कुठल्या एचटीपी पंपावर नेणार आहेत. त्या पाइपलाइनचा प्रवास आणि आकार याची सर्व माहिती येथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडून घ्यावी. काम कोण करतेय, जबाबदार अधिकारी कोण, किती महिन्यात योजना पूर्ण करणार, योजनेचा खर्च किती, योजनेच्या डीपीआरसह प्रत्येक भागात फलक लावण्याचा आग्रह धरावा. लोक जागृत राहीले आणि सुरवातीपासून यंत्रणेवर दबाब राहीला, तर काम चांगले होईल व काही वर्ष योजनेचा फायदा होईल.