नवी दिल्ली : इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला केला आहे. सीरियामध्ये असलेल्या इराणच्या दुतावासावर हल्ला झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी इराणने हा हल्ला केल्याचं सांगितलं जातं आहे. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून छुपे युद्ध सुरू आहे. मात्र पहिल्यांदाच समोरासमोरची लढाई होते आहे. तर इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की इस्रायल आणि त्यांच्या मित्र देशांनी 300 पेक्षा अधिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवेत हाणून पडले आहेत. यातील बहुतांश इस्रायलच्या हवाई हद्दीबाहेर पाडण्यात आले.
इस्रायलचं म्हणणं आहे की या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना त्यांच्या देशाच्या हवाई हद्दीबाहेरच पाडण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, ”हल्ल्यातील जवळपास सर्वच ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडण्यात आम्ही इस्रायलची मदत केली आहे.”
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं आधीच जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. आता इराणने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं आखाती देशांमधील तणाव निवळण्याऐवजी अधिकच वाढला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्षाकडं जगाचं लक्ष लागलेलं आहे. यात इस्रायल, इराणसह अमेरिका आणि इतर देशांची काय भूमिका आहे यावर देखील या परिसरातील शांतता अवलंबून असणार आहे.
इराणकडून हल्ला झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी वॉर कॅबिनेट म्हणजे युद्ध समितीची बैठक बोलावली आहे.यानंतर त्यांनी फोनवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली. नेतान्याहू यांनी सांगितलं की अमेरिकेने इस्रायलच्या सुरक्षेसंदर्भातील त्यांच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. इराणकडून ड्रोन हल्ला करण्यात आल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की ‘देशाच्या सुरक्षा यंत्रणेला कार्यरत करण्यात आले आहे.’
”आम्ही कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहोत. मग ती बचावात्मक असो वा आक्रमक. इस्रायल एक समर्थ राष्ट्र आहे. इस्रायलचं लष्कर सामर्थ्यवान आहे. जनतादेखील समर्थ आहे.” नेतान्याहू म्हणाले की आमची मदत केल्याबद्दल अमेरिकेसोबत ब्रिटन, फ्रान्स आणि इतर अनेक देशांचे आम्ही आभार मानतो. या आठवड्याच्या सुरूवातीलाच इस्रायलच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांनी चेतावनी दिली होती की जर इराणने इस्रायलवर हल्ला केला तर ते इराणवर प्रतिहल्ला करतील.