अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये स्फोट, 3 अतिरेकी ठार

0

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका गेस्ट हाऊसजवळ गोळीबार आणि स्फोट झाल्याचं वृत्त आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये बहुतांश चिनी व्यावसायिकांचा मुक्काम आहे.
मध्य काबूलमधील शहर-ए-नौ येथे हा हल्ला झाला.

तालिबानचे प्रवक्ते झबिउल्लाह मुजाहिद यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, हल्ला करणारे तीनही अतिरेकी मारले गेले आहेत.
झबिउल्लाह यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, “काबूलमधील एका हॉटेलमध्ये हल्ला झाला. तीनही हल्लेखोर ठार झाले आहेत. हॉटेलमधील सर्व पाहुण्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. केवळ दोन परदेशी पाहुण्यांनी खाली उडी मारल्याने त्यांना दुखापत झाली आहे.”
याआधी झबिउल्लाह मुजाहिद यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सशी केलेल्या संभाषणात या हल्ल्याला दुजोरा दिला होता, पण त्यांनी अधिक तपशील देण्यासा नकार दिला होता.
प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले की, ही घटना एका गेस्ट हाऊसजवळ घडली असून या गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिक राहतात.
काबूलमधील चिनी दूतावासाच्या हवाल्यानं शिन्हुआनं म्हटलंय की, चीन या संपूर्ण घटनेवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि मदतीसाठी आवश्यक पावलं उचलत आहे.
या स्फोटामुळे किती नुकसान झालंय हे सध्या स्पष्ट झालेलं नाही. या संदर्भात चिनी सरकार अथवा तालिबान प्रशासनानं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये.
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानच्या पुनरागमनापासून इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानमध्ये अतिरेकी हल्ले करत आहेत. याआधीही देशात परदेशी नागरिकांवर हल्ले झाले आहेत.
या हल्ल्याचे लक्ष्य चीनचे नागरिक होते की इतर कोणत्या परदेशी नागरिकाला हानी पोहोचवण्याचा यामागे उद्देश होता हे सध्या स्पष्ट झालेलं नाहीये.
एका प्रत्यक्षदर्शीने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलंय की, “हा स्फोट खूप मोठा होता आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबाराचे आवाज येत होते.” अजून तरी याप्रकरणी सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हल्लेखोर इमारतीच्या आत घुसल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. मात्र हल्लेखोरांची संख्या अद्याप कळलेली नाही.
अफगाणिस्तानला लागून ७६ किलोमीटर लांबीची सीमारेषा असलेल्या चीननं आतापर्यंत तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाहीये. असं असलं तरी अफगाणिस्तानशी राजकीय संबंध राखणाऱ्या देशांपैकी चीन हा एक देश आहे.
तालिबानच्या राजवटीत चीननं अफगाणिस्तानात आपल्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. यामागे चीनचे स्वतःचे काही हितसंबंध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here