अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा;दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आतिशी

0

नवी दिल्ली : मद्यधोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यापासूनच भाजपकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. या मागणीसह केजरीवाल यांची जागा कोण घेणार? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आतिशी यांची निवड झाली आहे. आतिशी यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत.

सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आतिशी यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर होतं. केजरीवाल तुरुंगात असताना आतिशी यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयांची जबाबदारी होती. मनीष सिसोदिया शिक्षणमंत्री असताना त्यांनी शिक्षण विभागात उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसंच सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत त्यांनी शिक्षण मंत्रालयही सांभाळलं. तसंच त्या केजरीवालांच्या विश्वासू आहेत. सद्यपरिस्थितीत त्यांचं नाव आघाडीवर होतं अशी माहिती पक्षातील सूत्रांनी बीबीसीला दिली होती.

आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचा एक ओळखीचा चेहरा बनण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या आतिशी यांच्या नावावर आज ( मंगळवार) शिक्कामोर्तब झालं. 15 सप्टेंबर 2024 रोजी केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यावेळीही निवडणुका जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जनता आदेश देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पुन्हा बसणार नाही, असे केजरीवाल म्हणाले होते.

केजरीवाल यावेळी म्हणाले, ”मी दिल्लीच्या गल्लीबोळांत, घराघरांत जाणार आहे. केजरीवाल प्रामाणिक आहे, असा निकाल जनता जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही.” दिल्लीतील कालकाजी येथील आमदार आतिशी यांच्याकडे सध्या शिक्षण आणि सामाजिक बांधकाम या सारखी महत्त्वाची खाती आहेत. मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्रिपद सोडले आणि त्यानंतर आतिशी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here