केंद्रात आमचं सरकार स्थापन झालं तर सैन्य भरतीसाठी मोदी सरकारने सुरू केलेली अग्निवीर योजना बंद करू, असं राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. ते रविवारी (19 मे) उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे एका निवडणूक रॅलीला बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही व्यासपीठावर उपस्थित होते. “INDIA आघाडीचं सरकार आलं तर अग्निवीर योजना कचऱ्यात टाकू. तसचं जुन्या पद्धतीने सर्व सैनिकांना सुविधा देऊ आणि कुणासोबत दुजाभाव केला जाणार नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
ते पुढं म्हणाले, “हा लढा संविधानाचा आहे. भाजप, आरएसएसकडून त्यावर हल्ला होतोय. मी त्यांना सांगू इच्छितो की आंबेडकरांचे संविधान, जवाहरलाल नेहरूंचे संविधान आणि हे लोकांचे संविधान आहे. त्यात आम्ही बदल होऊ देणार नाही.” नरेंद्र मोदींनी 22 लोकांना अब्जाधीश बनवलंय. त्यांनी 22 लोकांना सर्व फायदे दिले आहेत. असाही आरोप गांधी यांनी केला.
“आमचं सरकार आलं तर आपण कोट्यवधी लोकांना करोडपती बनवणार आहोत. भारतातील सर्व गरीब लोकांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचे नाव निवडले जाईल आणि त्यानंतर आम्ही करोडो महिलांच्या खात्यात वर्षाला 1 लाख रुपये आणि दरमहा 8500 रुपये जमा करू,” असंही गांधी पुढं म्हणाले.