नवी दिल्ली : इंडिया आघाडीचं सरकार आलं की, देशभरातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. राहुल गांधी पंजाबमधील लुधियानातील सभेत बोलत होते.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, “जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. ते अब्जाधीशांचं कर्ज माफ करतात आणि आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू.”
“आम्ही केवळ एकवेळ कर्ज माफ नाही करणार. आम्ही एक आयोग बनवू ज्याचं नाव असेल ‘किसान कर्जमाफी आयोग.’ जेव्हा शेतकऱ्यांना कर्ज माफीची गरज असेल तेव्हा तो आयोग आम्हाला सांगेल आणि आम्ही तेव्हा गरजेनुसार कर्ज माफ करू. मग ते एकदा होईल किंवा दोनदा होईल.”
राहुल गांधी यांनी म्हटलं की, “नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे की, शेतकऱ्यांना कायदेशीररित्या किमान हमी भाव देऊ शकत नाही.”“निवडणुकीनंतर चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा खात्रीने कायदेशीररित्या पीकाला किमान हमी भाव देऊ.”