दंतेवाडा : छत्तीसगडमधील माओवादाने प्रभावित नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत आठ संशयित माओवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. शोध मोहीम अजूनही सुरू असून मृतांचा आकडा वाढू शकतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “बुधवारी रात्री नारायणपूरच्या रेकावाया भागात माओवादी असल्याची बातमी मिळाल्यानंतर, नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा या तीन जिल्ह्यांतील बस्तर फायटर, एसटीएफ आणि जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांनी मोहीम सुरू केली. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर चकमक सुरू होती.”
दोन्ही बाजूंनी गोळीबार होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून सात माओवाद्यांचे मृतदेह आणि एक ऑटोमॅटिक रायफल जप्त केली. या कारवाईत सहभागी सुमारे एक हजार सैनिकांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला होता.
शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी सांगितलं की त्यांनी आणखी एका संशयित माओवाद्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आठवर गेली आहे. पोलिसांच्या मते, चकमक झाली त्या भागातून सैनिक अद्याप परतले नाहीत. ते परतल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी म्हटलं की, हे आमच्या सैनिकांचं मोठं यश आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, “मी सैनिकांच्या धैर्याला सलाम करतो. नक्षलवाद संपवणं हे आमचं ध्येय आहे.” गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये संशयित माओवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. गेल्या महिन्यात, 2 एप्रिल रोजी पोलिसांनी गांगलूर भागात 13 माओवाद्यांना मारल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे, 16 एप्रिल रोजी पोलिसांनी सांगितलं की, कांकेरच्या काल्परमध्ये झालेल्या चकमकीत 29 माओवादी मारले गेले. आत्तापर्यंतच्या नक्षल इतिहासात छत्तीसगडमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकाच चकमकीत एवढे माओवादी कधीही मारले गेले नव्हत”
पोलिसांनी यापूर्वी 30 एप्रिल रोजी टेकामेटा मध्ये 10 माओवाद्यांना आणि या महिन्यात 10 मे रोजी पेडियामध्ये 12 माओवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता.