“परदेशातून जारी केला व्हीडिओ
नवी दिल्ली : कर्नाटकमधील हासनचा जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णाने आज (27 मे) व्हीडिओ जारी करत माहिती दिली की, “31 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहीन.” प्रज्वल रेवण्णावर अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. कथित लैंगिक शोषणाच्या शेकडो व्हीडिओ क्लिप समोर आल्याचाही आरोप आहे.
रेवण्णानं जारी केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटलंय की, “या प्रकरणावर मी उत्तर दिलं नव्हतं, कारण मी ‘डिप्रेस’ होतो. सर्वांपासून मी स्वत:ला वेगळं केलं होतं. माझ्यावरील महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप राजकीय कटातून लावण्यात आलेत.”
रेवण्णा पुढे म्हणाला की, “26 एप्रिलला मतदान झालं, तोपर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. माझा परदेश दौरा आधीच ठरलेला होता. तीन-चार दिवसांनी मी यूट्यूब चॅनेल पाहत होतो आणि मला या आरोपांची माहिती मिळाली. एसआयटीने पाठवलेल्या नोटिशीला मी उत्तर दिलंय. मी माझ्या वकिलामार्फत हजर होण्यापूर्वी सात दिवसांचा अवधी मागितला.
“दुसऱ्याच दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी हा राजकीय मुद्दा बनवून माझ्याविरुद्ध राजकीय कट रचण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहून मी डिप्रेशनमध्ये गेलो. हासनमधील काही राजकीय शक्ती मला रोखू इच्छित आहेत. त्यामुळे माझ्याविरुद्ध कट रचला जात आहे.
“हे सर्व पाहिल्यानंतर मी स्वतःला सर्वांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मी शुक्रवार, 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होत असून तपासात पूर्ण सहकार्य करेन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला या प्रकरणातून बाहेर पडण्याची पूर्ण आशा आहे.”