नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (17 जून) याबाबतची घोषणा केली. प्रियंका गांधी या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राजकारणात प्रवेश केल्यापासून प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढणार आहेत.
आज (17 जून) प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, 2019 पासून वायनाडचे खासदार म्हणून काम करणाऱ्या राहुल गांधी यांनी बहिणीसाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.
4 जूनला लागलेल्या निकालानंतर त्यांना या दोन्हींपैकी एका जागेवर राजीनामा द्यावा लागणार होता. राहुल गांधी रायबरेलीची जागा सोडून वायनाडचे खासदार राहणार अशा चर्चा सुरुवातीला केल्या जात होत्या पण आता अखेर राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नियमानुसार निकाल लागल्यानंतर 14 दिवसांच्या आत राहुल गांधींना हा निर्णय घ्यायचा होता. गांधी कुटुंबीयांची परंपरागत जागा असणाऱ्या रायबरेलीमधून स्वतः राहुल गांधी हे खासदार असणार आहेत तर दक्षिणेतील वायनाडमधून त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही घोषणा केली आहे. प्रियंका गांधी आता वायनाडमधून पोटनिवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. वायनाडमधून प्रियंका गांधींनी विजय मिळवला तर लोकसभेत भाऊ-बहिणीची ही जोडी काँग्रेसचं नेतृत्व करताना दिसू शकते.