चंदिगढ : 18 मार्चपासून फरार असलेला ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलीस विशेष विमानाने त्याला आसाममधील दिब्रुगडला घेऊन जात आहेत. पंजाब पोलिसांनी ट्वीट केले की, अमृतपाल सिंहला पंजाबमधील मोगा येथून अटक करण्यात आली आहे.
जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा याच गावचा रहिवासी होता. याच गावात त्यांना ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेचे प्रमुख बनवण्यात आले होते. अटक करण्यापूर्वी अमृतपाल सिंगने गुरुद्वाराच्या ग्रंथीकडून पाच काकर (केस, साबर, कंगवा, कडा आणि कच्छा) घेतले आणि लोकांना संबोधित केलं. आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. याचा एक व्हीडिओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्याचं भाषण संपल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याला गुरुद्वाराबाहेरून अटक केली.
अकाल तख्तचे माजी जथ्थेदार आणि जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे पुतणे जसबीर सिंग रोडे यांनी अमृतपाल सिंहच्या अटकेनंतर बीबीसीशी संवाद साधला आहे. जसबीर सिंग रोडे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री पोलिसांनी त्यांना सांगितले की खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहला रोडे गावातून अटक करायची आहे. याच कारणासाठी ते स्वतः रोडे गावात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
अमृतपाल सिंहच्या अटकेबाबत जसबीर सिंग रोडे म्हणाले, “अमृतपाल सिंहने आधी ‘नितनेम’चे पठण केले. त्यानंतर त्याने उपस्थितांना थोडक्यात संबोधित केले आणि नंतर गुरुद्वारा साहिबच्या बाहेर गेला, जिथे त्याला अटक करण्यात आली.अमृतपाल सिंह यापूर्वी आपल्या संपर्कात नव्हते, असा दावाही जसबीर सिंग यांनी केला आहे.
18 मार्च रोजी पोलिसांनी अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदारांना जालंधरमधील अजनाळा पोलिस ठाण्याच्या घेराव प्रकरणी अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फरार झाले.