नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेतेच मोदी सरकारची गोची करताना दिसत आहेत. त्यांच्या विधानांमुळे भाजप सरकारचा खरा चेहरा उघडा पडत असल्याचे चित्र आहे. आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच भ्रष्टाचाऱयांसाठीही भाजपची दारे सदैव उघडी असतात, असे म्हटले आहे.
ज्यांना भाजपने भ्रष्टाचारी म्हणून हिणवले गेले त्यांनाच आता भाजपमध्ये घेतले गेले. याबद्दल विचारले असता आम्ही त्यांना पक्षात घेत नाही, तेच आमच्यासोबत येत आहेत. सर्वांसाठी भाजपचे दरवाजे सदैव उघडे आहेत. आमचे मुख्य उद्दिष्ट विकास हेच आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले.
निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले. विरोधी पक्षांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला. एकेकाळी ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवत होतात तेच आता भाजपसोबत आहेत. आदर्श घोटाळय़ाचे आरोपी अशोक चव्हाण भाजपसोबत आहेत, 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाचा आरोप झालेले अजित पवार आता भाजपच्या विकासाचे आयकॉन झालेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा परखड सवाल पत्रकाराने विचारला असता, आम्ही भाजपमध्ये त्यांचे स्वागत करतो, असे त्या म्हणाल्या. निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भाजपमध्ये प्रवेश होताच चौकशी बंद
अशोक चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आदर्श घोटाळय़ात त्यांचे नाव आल्याने त्यांना पद सोडावे लागले. चव्हाणांची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श घोटाळय़ावरून चव्हाणांना लक्ष्य केले होते. चव्हाण भाजपवासी होताच ही चौकशी बंद झाली.
तब्बल 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळय़ाचा आरोप असलेले अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथविधी घेताच त्यांची फाईल बंद करण्यात आली. शिखर बँक घोटाळय़ातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. मात्र ती चौकशीही थांबली आहे. मुख्य म्हणजे मोदींनी सिंचन घोटाळय़ावरून आरोप केले होते.