मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

अलिबाग, दि. 30 (जिमाका) :- मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले.

कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 कि.मी. आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 कि.मी. आणि मूल्य 35.99 कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव,ता.पनवेल येथे  संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध व्यावसायिक जे.एम.म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री.शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदि मान्यवर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

“मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील 66 पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी 2011 मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत.

आता महामार्गाचे 11 टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल” असा विश्वास व्यक्त करून त्यांनी राज्य सरकारांना 6-8 इंच टॉपिंग असलेले रस्ते बनविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले, जेणेकरुन हे रस्ते किमान 50 वर्षे टिकतील, तसेच दुरुस्तीसाठी कमी खर्च येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here