मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश
राजकोट : गुजरातच्या राजकोटमधील मॉलमध्ये आगीची भीषण घटना घडली. मॉलमधील गेम झोनमध्ये लागलेल्या या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राजकोटमधील नाना मावा रोडवर हा मॉल असून, तिथे गेम झोन आहे. या गेम झोनमध्ये लहान मुलं होती. त्यामुळे या आगीतील मृतांमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे.
राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनेच्या दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. राजू भार्गव म्हणाले की, “आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. युवराज सिंग सोलंकी हा या गेमझोनचा मालक आहे. आम्ही या प्रकरणी मृत्यू आणि निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवू. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास करू.” गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.
सरकार मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत करेल.” तसंच, जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी व्यवस्था उभारण्याचे आदेश दिल्याची माहितीही भूपेंद्र पटेल यांनी एक्सवरून दिली.