कर्नाटकमध्ये भाजप-जेडीएस आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना जेडीएसने पक्षातून निलंबित केलं आहे. पक्षाचे सरचिटणीस के. आर शिवकुमार यांनी बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाचा व्हीडिओ पेन ड्राइव्हच्या माध्यमातून सोशल झाल्यानंतर कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
हे व्हीडिओ पेन ड्राइव्हमधून बस स्टॉप, पार्क, गावांमधील यात्रा आणि अगदी घरांमध्येही पोहोचविण्यात आले. त्यावरून राजकारण तापायला लागल्यानंतर जेडीएसने रेवण्णा यांना निलंबित केलं. हासन लोकसभा मतदारसंघातील मतदानाला पाच दिवस बाकी असताना हा व्हीडिओ सार्वजनिक करण्यात आला.
प्रज्वल रेवण्णा हे एचडी देवेगौडा यांचे नातू आणि एचडी कुमारस्वामी यांचे पुतणे आहेत. सोमवारी (29 एप्रिल) सकाळी कुमारस्वामी यांनी म्हटलं होतं की, पक्ष कोणालाही पाठीशी घालत नाहीये. जे झालं ते खूप निंदनीय आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, “नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही एक निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. काका नात्याने नाही तर देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो की, लोकांनी आता हे मागे टाकावं. ही निंदनीय घटना आहे. आणि मी कोणालाही पाठिशी घालत नाही.” “आम्ही या प्रकारच्या घटनांविरोधात लढत आलोय, हा गंभीर मुद्दा आहे. सरकार कोणाचं आहे, खऱ्या गोष्टी त्यांना समोर आणायच्या आहेत आणि वस्तुस्थिती त्यांनी सांगायची आहे; मी नाही.”