राजे रामराव महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप*
जत दि.2(प्रतिनिधी) मराठी भाषा म्हणजे आपल्या मनाचं, ह्रदयाचं वैचारिक भरण पोषण करणारी अमृताची खाण आहे. पण आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपले भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. विपुल शब्दसंपत्ती हे मराठी भाषेचं वैभव असून त्यांची जोपासना करणे गरजेचे आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाला घडवून आपले मन, बुद्धी व विचारांना सामर्थ्य करण्याचे काम मराठी भाषा करीत असते असे प्रतिपादन कवी इंद्रजीत घुले यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आपल्या प्रस्ताविकात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा व स्पर्धांचा आढावा घेतला. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ उपस्थित होते.
कवी इंद्रजित घुले बोलताना पुढे म्हणाले की, एक चांगलं पुस्तक आपणाला रद्दी होण्यापासून वाचवते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिवसातून एक तास तरी वाचन केले पाहिजे. वाचनामुळे आपली वैचारिक प्रगल्भता वाढते. ज्या ज्या वेळेला तुम्हाला व्यक्त व्हावंसं वाटतं, त्या त्या वेळेला व्यक्त व्हा, कागदावर शब्द लिहा. त्यातूनच काव्य, साहित्य जन्माला येते, असे सांगून त्यांनी स्वरचित प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक कविता व गझल आपल्या फर्ड्या आवाजात गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
अध्ययस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, शिक्षण हे श्रमाकडे, सत्याकडे घेऊन जाणारे असावे. आपल्या मनात सामर्थ्य असेल तर बाहेरची कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही असे सांगून ते शेवटी म्हणाले की, आपण दैनंदिन जीवनात इतकं गुरफटून जातो की आपण खऱ्या आनंदी जीवनाला मुकतो. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर पुस्तकांकडे वळा. पुस्तके आपणाला विविध वाटा दाखवून आपले जीवन आनंदी करतात.
यावेळी मराठी विभागाच्या वतीने १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने शब्दकोडे स्पर्धा, निबंध स्पर्धा, म्हणी-उखाणे स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, प्राध्यापिका रेश्मा लवटे, प्रा.सदाशिव माळी यांनी काम पाहिले. यावेळी विविध स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी श्री स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांची ओळख मराठी विभागातील सहाय्यक प्रा.सदाशिव माळी यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापिका रेश्मा लवटे यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.