अकरा जिल्ह्यांमध्ये अजूनही दुष्काळी परिस्थिती

0

पुणे : राज्यात पावसाने ओढ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरांसह ११ जिल्ह्यांच्या घशाला कोरड पडली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि लातूर येथे जूनमध्ये आतापर्यंत तेथील सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
राज्यात १ ते २४ जून या दरम्यान सरासरी १५०.८ मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत १५८.८ म्हणजे सरासरीपेक्षा पाच टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे. त्यापैकी सर्वाधिक पाऊस अवर्षणग्रस्त जिल्हे असलेल्या सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात झाला आहे. सोलापूर येथे २३ जूनपर्यंत सरासरी ८५.२ मिलिमीटर पाऊस नोंदला जातो.

या वर्षी सरासरीपेक्षा १४० टक्के जास्त म्हणजे २०४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूरमध्ये या दरम्यान १०९.७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा २२६.५ (१०६ टक्के) मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले.

पावसाचा भाग असलेल्या कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली तरीही मुंबई, मुंबई उपनगरांसह नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे या ११ जिल्ह्यांमध्ये पावसाळा सुरू होऊनही सरासरी इतकाही पाऊस पडलेला नसल्याची खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

हवामान खात्याच्या मध्य महाराष्ट्र या हवामान उपविभागातील पुणे, नाशिक आणि सातारा तसेच, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. तर, धुळे, जळगाव, बुलडाणा, वाशीम, जालना, परभणी, बीड, नगर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here