कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. भूमिहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलविण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य नाईक यांनी केले. शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विद्यापीठाची स्थापना केली. 1972 सारख्या भीषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी ‘शेतकरी आत्महत्या’ हा शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषीसंस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते.
“शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजे” हे महानायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषीतंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती, शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईकसाहेबांचे स्वप्ने पुर्णत्वास येऊ शकते. भारतीय कृषीसंस्कृतीला उजाळा देणाऱ्या ‘कृषी दिन’ या पावन पर्वाचे जनमानसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय, गाव शहरात अनेक जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर थेट बांधावर-शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात ‘कृषी दिवस’ साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ मोहीमेचे प्रवर्तक एकनाथराव पवार यांनी 2011 पासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली. आज ही संकल्पना एक प्रथा म्हणून नावारूपाला आली. शेती, शेतकरी आणि ऋतूचक्र याचं अविरत कार्य करत राहणं हीच बाब सृष्टीच्या समतोलला कायम ठेवणार आहे. मात्र या तिन्ही घटकांना नकळतपणे इजा पोहचवली जात आहे. शेतीविषयी ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांविषयी आस्था नाही, म्हणुन सध्या शेतकरी हवालदील होऊन आत्महत्या सारखे प्रकार आज महाराष्ट्रात वाढताहेत ही शोकांतीका !
महाराष्ट्र शासनाने विविध खात्यामार्फत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांपर्यंत संदेश लोकप्रतिनिधी पर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याने देशातील सर्वात मोठा शेतकी मेळावा व राष्ट्रीय दर्जाच्या महत्वाकांक्षी प्रदर्शने “कृषी वसंत-2014” हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी महोत्सानिमित्त आयोजित केला होता, ते ही वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर. सदर मेळाव्यास एक लाखाहून अधिक शास्त्रज्ञ, होतकरु शेतकरी, अधिकारी, कृषी अधिकारी, व्यापारी, प्रतिनिधी, विक्रेते व ग्राहकांनी भेटी दिल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होण्यास निश्चितपणे मदत झाली.
भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ञ व महाराष्ट्राचे तत्कालीन दिवंगत शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक, महानायक वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत असते. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी, क्रांतिकारी कृषीसंत वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, “मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर देहाने जरी असलो तरीदेखील माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो.” हा ‘वसंतविचार’ लक्षात घेता शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली. या प्रवासात मात्र ‘पवार’ हा एक दुर्मिळ संयोग जुळून आल्याचे म्हणता येईल. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होतांना दिसून येते.
कृषी दिन हा कृषी प्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते. वसंतराव नाईक यांचे भारतीय राजकारण, लोकशाही सक्षमीकरण व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना ‘महानायक’, ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’ म्हणूनही आदराने संबोधले जाते. शिवाय भारताचे राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात नाईकांचे गौरव केले आहे. तसेच ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी “आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत” या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.
हा पर्व थेट बांधावर, शेत शिवारातही साजरा होत असून यात शेतकरी सन्मान, समुपदेशन , फळझाडांची लागवड व शेतकऱ्यांचे भाग्यविधाते महानायक वसंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी कृषीसंस्कृतीचे संस्मरण करून कृषीसंस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केल्या जाते. थेट शेत बांधावर शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी, शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिवस थेट बांधावर, शेत शिवारात साजरा करण्याची सर्वप्रथम मोहीम सुरू केली होती. या मोहीमेची दखल पुढे सामाजिक स्तरासोबतच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली. शिवाय पुढे 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात शासनस्तरावरही दखल घेण्यात आली. त्यामुळे कृषी दिन थेट शेत बांधावरही साजरा होत असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. कार्यालयात साजरा होणारा कृषी दिन हा आता थेट बांधावरही साजरा केला जात असून कृषीदिनानिमीत्त थेट बांधावर कृषी संजीवनी सप्ताह, वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान व शेतकरी कृतज्ञता सप्ताह सारखे स्तुत्य उपक्रम दरवर्षी राबविले जातात. राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन म्हणजेच वसंतराव नाईकांचा जन्मदिनसाजरा केला जातो. या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो.
कृषी क्षेत्रात अद्वितिय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक व्यक्ति किंवा संस्थेस “कृषी भूषण” पुरस्कार देण्यात येतो. तसेच जे जाणते शेतकरी ज्यांना कृषी ज्ञानाचा फायदा परिसरातील इतर शेतकऱ्यांना देतील आणि शेती उत्पादनात भर वाढविण्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील किंवा प्रोत्साहित करतील अशा व्यक्तिस किंवा संस्थेस बहुमान प्रदान करण्यात येतो. ही महाराष्ट्राची अभिनव योजना आहे, याचा फायदा बहुतांश शेतकरी घेत असतात.
प्रविण बागडे
नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com