तासगाव : जगात द्राक्ष आणि बेदाण्याच्या अनेक जाती विकसित झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात द्राक्ष आणि बेदाण्यासाठीच्या नवीन जाती कशा आणता येतील याकडे लक्ष द्यावे, त्यासाठी द्राक्ष संघाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
तासगाव (जि. सांगली) येथे सोमवारी (ता. ८) राज्य द्राक्ष संघाच्या सांगली विभागाच्या शाखेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते. या वेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, माजी खासदार संजय पाटील, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, मध्यवर्ती विज्ञान केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जगन्नाथ मस्के, सुभाष आर्वे, रोहित पाटील आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, की शेतीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. शेतीमध्ये हवे ते पिकवण्याची जिद्द इथल्या शेतकऱ्यांमध्ये आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कितीही संकटे आली तरी त्यावर मात करण्यासाठी शेतकरी तयार असतो. उत्तम द्राक्ष तयार करण्याच्या क्षेत्रात तासगाव- सांगलीचा समावेश झाला आहे.
आधुनिकतेचा विचार करुन इथला शेतकरी पाऊले टाकत आहे. सांगलीची बाजारपेठ ही हळद बेदाण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज हळद-बेदाणा मार्केट वाढवण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. रोजगार हमी योजनेतून राज्यात फळबाग लागवड वाढली. आज जगातील बाजारपेठेत भारतातील फळे विक्रीला जातात. राज्यातील सर्वाधिक फळे जगाच्या बाजारपेठेत विक्री होते.
माजी खासदार संजय पाटील म्हणाले, की ड्रायपोर्टची मागणी पूर्वीचीच आहे. या बाबत गेल्या आठवड्यात केंद्र आणि राज्य सरकार बरोबर चर्चाही झाली आहे. सलगरे (ता. मिरज) येथील ६०० एकर जागेपैकी २५० एकर जागेचा प्रस्तावही दिला आहे. त्यामुळे ड्रायपोर्टचा प्रश्न मार्गी लागेल.
या वेळी सांगली विभागाचे मानद सचिव प्रफुल्ल पाटील, विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते, प्रास्ताविक उपाध्यक्ष कैलास भोसले, शिवाजी पवार यांनी मनोगत व्यक्त केले, चंद्रकांत लांडगे यांनी आभार मानले.