कोपरगाव : यंदा खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणी करण्याची वेळ ओढवली आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत कोपरगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रार करून त्याची पोहोच घ्यावी, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्याकडे मांडल्या. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने आपल्या तक्रारी कोपरगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात दाखल करून त्याची पोहोच घ्यावी, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी संबंधित शेतकऱ्यांना केले आहे.
पेरण्यानंतर बियाणे उगवलेच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेला असून, मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
यासंदर्भात शासनाने पाहणीसाठी एक समिती गठीत केली आहे. संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून, कोपरगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाबीजचे प्रतिनिधी, बियाणे कंपनीचे अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन ही समिती पाहणी करून पंचनामे करणार आहे व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. त्या दृष्टीने संबंधित शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या आपल्या लेखी तक्रारी कोपरगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दाखल कराव्यात आणि त्याची पोहोच घ्यावी, असे कोल्हे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कपण्यांची चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.