लाल भडक अन्‌ भाव कडक! यंदा डाळिंबाला अच्छे दिन

0

200 रुपयांवर होताहेत जागेवरच सौदे

बिजवडी : तेल्या, पिनहोल बोरर, मररोगामुळे डाळिंब फळबागांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे
त्याचा परिणाम म्हणून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने डाळिंबाच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही डाळिंबाला अच्छे दिन आले असून, शेतकऱ्यांच्या चांगल्या मालाला जागेवरच दोनशे रुपयांवर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत (Farmers) आनंदाचे वातावरण आहे.

डाळिंबाची आवक वाढल्यानंतर दर कमी येणार असले, तरी सध्या तरी लाल भडक अन्‌ भाव कडक अशी डाळिंबाची अवस्था आहे. गेल्या वर्षी माण तालुक्यातील बिदालच्या नीलेश अडसूळ या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मार्केटमध्ये एका किलोला ५५० रुपये दर मिळाला होता. यंदा फलटण, बारामती तालुक्यातील चांगल्या डाळिंबाला जागेवरच २०० पासून २२४ रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. यंदा माण-फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणीटंचाई, विविध रोगांवर मात करत चांगल्याप्रकारे फळबागा जोपासल्या आहेत.

त्यांच्या बागेतल्या फळांच्या तोडणीला दीड-दोन महिने बाकी आहेत. यंदा जूनपासून सततच्या पावसामुळे विविध रोगांना निमंत्रण मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर औषधांचा वाढीव बोजा पडत आहे. अनेकांच्या बागांना तेलकटने वेढा दिला असतानाही बागांसाठी त्यांची धडपड सुरू आहे. वातावरणाच्या लहरीपणामुळे तसेच विविध रोगामुळे डाळिंबाचा मोठा खर्च वाढला आहे.

डाळिंबाला अच्छे दिन दिसत असल्याने नवीन शेतकरीही फळबागांकडे वळल्याने डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. याबरोबरच शेतकरी सीताफळ, पेरू, आंबा लागवडीकडेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लाखो रुपये खर्चून आपल्या फळबागांचे बहारांचे नियोजन करून विकतचे पाणी घालून अनेकजण बागा जोपासत आहेत. सध्या डाळिंबाला चांगले दिवस आल्याने शेतकऱ्यांत समाधान दिसून येत असून, त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे.

फळबागांसाठी नरेगा विभागातून रोजगार हमी योजनेंतर्गत चांगले अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन माण पंचायत समितीकडून करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here