सातारा : बाहेरच्या जिल्ह्यात सध्या बोगस पीक विमा काढण्याची प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. सातारा कृषी विभागाने यावर्षी पुढाकार घेत बोगस पीक विमा घेतलेली प्रकरणे उघड करत शासनाचे साडेपाच कोटी रुपये वाचविले आहेत.
यामध्ये खरिपातील कांदा पिकासाठी घेतलेल्या बोगस पीक विम्याची १८ हजार, तर फळबागेची २५० प्रकरणे उघडकीस आणली आहेत. शासनाची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसविला आहे. या कामगिरीची शासनाने दखल घेत कृषी विभागाला पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.
सध्या बोगस पीक विमा प्रकरणे उघडकीस येत असून, अनेक शेतकऱ्यांच्या नावावर बोगस विमा काढून त्यातून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार समोर येत आहे. या बोगसगिरीला सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी चाप लावला आहे. खरिपासाठी कांदा लागवड व फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा घेतला होता. यातील काही शेतकऱ्यांचे क्षेत्र जुळत नसल्याचे तर काही ठिकाणी एनए जागेवर कांदा लागवड केल्याचे निदर्शनास आले होते. यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी पुढाकार घेत या प्रकरणाची सखोल चौकशी केली. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पथक पाठवून व स्वत: जाऊन पाहणी केली. त्या वेळी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष लागवड क्षेत्र आणि कांदा लागवड तसेच फळबाग लागवडीचे क्षेत्र यामध्ये तफावत आढळली.
या तालुकानिहाय केलेल्या तपासणीत कांदा पिकाची १८ हजार ५१३ बोगस प्रकरणे आढळली. यातून ९२७८ हेक्टरवर कांदा लागवड नसल्याचे उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे फळपीक लागवड केल्याचे दाखवून विमा घेण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणात २२३ हेक्टरवरील ५१७ लाभार्थी बोगस आढळले आहेत. या सर्व प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ही प्रकरणे तातडीने रद्द केली आहेत. त्यामुळे शासनाकडून विमा कंपनीला जाणारे साडेपाच कोटी रुपये वाचले आहेत. सातारा जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या कारवाईबद्दल कृषी संचालकांनी पत्र पाठवून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचे अभिनंदन केले आहे.
दरात होणारे चढउतार आणि अवकाळी पावसामुळे होणारे कांदा पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शासनाने रब्बी कांद्याला विमा संरक्षण दिले आहे. हेक्टरी ४६ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एक रुपयांत विमा संरक्षण घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा बॅंकेत खाते आहे, अशा शेतकऱ्यांनी बॅंकेत अथवा टपाल कार्यालयात जाऊन विमा हप्ता भरावा. त्यासाठी कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
– भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कांदा लागवड नसलेले तालुकानिहाय क्षेत्र व कंसात लाभार्थी
फलटण : ११५१.८२ (८४५)
खंडाळा : १४५३.८३ (१४५०)
खटाव : २६४४.९८ (७६१६)
माण : ३८२७.२६ (८६५१)
कोरेगाव : १९८.९१ (४९३)
एकूण : ९२७७ (१८७५५)
बोगस फळ लागवड क्षेत्र व कंसात लाभार्थी
फलटण : २१ (४६)
खंडाळा : एक (४)
खटाव : सहा (१५)
माण : १९६ (४५२)
एकूण : २२३ (५१७)