सेंद्रिय मध संकलनाच्या व्यवसायातून महिलांना रोजगाराच्या संधी : तेजस्विनी पाटील

0

सातारा दि. 6 : सेंद्रिय मध संकलन व्यवसायातून महिलांसाठी रोजगाराची चांगली संधी असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयाने दि. 3 जून 2023 रोजी मौजे वाळणे ता. महाबळेश्वर येथे शासन आपल्या दारी अंतर्गत मधमाशा पालन प्रशिक्षण आणि जन जागृती शिबिर आयोजित केले होते त्या वेळी त्या बोलत होत्या.

या शिबिरात कांदाटी- कोयना खोऱ्यातील, रेनोशी, खरोशी, कोठ्रोशी, दाभे, रुळे, आवळन आहिर, गावढोशी, दरे ,निवळी, आकल्पे, लामज, वागावळे, ऊचाट, सालोशी  इ. गावातील सुमारे 200 मधपालक, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीमती तहसीलदार म्हणाल्या, सेंद्रीय मध संकलनाला चालना देण्यासाठी  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने सुरू केलेला हा  अभिनव उपक्रम स्तुत्य असून कांदाटी खोऱ्यात मध उद्योगासाठी मोठी क्षमता उपलब्ध आहे. विशेषकरून महिलांनी स्वजबाबदारी सांभाळून मध पेट्यातून  मध माशा पाळून सेंद्रिय मध गोळा गोळा करून हक्काचे उत्पन्नाचे साधन निर्माण करावे.

 महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी सांगितले की, मध व्यवसाय करणेसाठी 50 टक्के शासन अनुदान मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण विनामूल्य असून महिला व पुरुष सर्वांसाठी उपलब्ध आहे.

 कांदाटी – कोयना खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे म्हणाले की, कांदाटी कोयना खोऱ्यातील मधाचा एक ब्रँड विकसित करावा यासाठी मंडळाने प्रकल्प करावा, पारंपरिकता जपत त्यामध्ये नाविन्यता आणून रोजगार वाढीस चालना द्यावी. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी यांनी  मुख्यमंत्री / पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची माहिती दिली. कृषी विभागाचे पर्यवेक्षक एम.बी.पाटील, रिकेश पाटील, कृषी सहायक यांनी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण दिले. सेंद्रिय मध संकलक नाव नोंदणी करण्यात आली व मध केंद्र योजनेअंतर्गत मध पेट्यांची मागणी घेण्यात आली.

यावेळी सुनील नलावडे, आनंद कोंडिराम नलावडे, विठ्ठल सपकाळ गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले . आर्या दीपक नलावडे, प्रतीक प्रकाश कांबळे,शैलेश संतोष नलावडे, आर्यन आनंद नलावडे उज्वला प्रकाश सपकाळ या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मी सुनील नलावडे, उपसरपंच वाळणे, आवेश विठ्ठल ढेबे सरपंच वाळणे, पांडुरंग सदाशिव सुतार, तुळशीराम शेलार, शंकर मानाजी वाळणेकर, प्रकाश बाळू सपकाळ  विजय खरात सर्कल, गजानन भोयर निरीक्षक, तसेच शासन आपल्या दारी या मंडळाच्या उपक्रमास व आयोजित मेळाव्यास नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील नलावडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here